यशवंतनगरातील अस्वच्छता सीईओ आव्हाळे यांनी व्यक्त केली नाराजी

सोलापूर : जिल्हा परिषदेचे पदाधिकारी व कर्मचाऱ्यांचे निवासस्थान असलेल्या रंगभवन चौकातील यशवंतनगरला मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे यांनी गुरुवारी अचानक भेट देवून परिसराची पाहणी केली. परिसरात असलेले अस्वच्छता पाहून त्यांनी निवासी कर्मचारी व संबंधित ठेकेदाराला सूचना दिल्या. अस्वच्छतेबाबत ठेकेदारावर दंडात्मक कारवाई करण्याचे आदेशही त्यांनी यावेळी दिले.

यावेळी बांधकाम विभाग क्रमांक १ चे कार्यकारी अभियंता  नरेंद्र खराडे, बांधकाम विभाग क्रमांक २ चे कार्यकारी अभियंता  संतोष वि कुलकर्णी व मुख्यालय स्थापत्य अभियांत्रीकी सहायक चेतन वाघमारे उपस्थित होते.मुख्य कार्यकारी अधिकारी आव्हाळे यांनी यशवंत नगर परिसरातील निवासस्थाने व परिसराची पाहणी केली असता यातील बरीच निवासस्थाने ही प्रमुख दुरुस्तीच्या प्रतिक्षेत असल्याचे तसेच उर्वरीत परिसर हा स्वच्छतेच्या दृष्टीने ही असमाधानकारक असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.याबाबत या परिसराची स्वच्छता करण्याबाबत मुख्यालयामार्फत मम्हाणे सिक्युरिटी या ठेकेदारास कामात निष्काळजी पणा केल्याबद्दल निविदा शर्ती व अटीनुसार दंड आकारण्याबाबत सुचीत केलेले आहे. तसेच या इमारतींची व इमारतींच्या परिसराची स्वच्छता करणे ही फक्त मक्तेदाराचीच जबाबदारी नसून तेथे राहणारे कर्मचारी व अधिकारी यांचीही असल्याबाबत त्यांनी अधोरेखीत करुन संबंधीतांना परिसर व निवासी इमारती स्वच्छ राखणेबाबत  सुचना दिल्या आहेत.

कोविड १९ या जागतिक महामारीच्या वेळी जिल्हा परिषद प्रशासनाने विविध उपक्रम राबवून या महामारीबाबत जनजागृती तसेच स्वच्छते करीता हात धुवा सारखे अभिनव उपक्रम ही राबविलेले आहेत परंतू या उपक्रमाच्या वेळी वापरण्यात आलेली साधन सामुग्री जसे की वॉश बेसीन, पाण्याच्या टाक्या या वापरानंतर याच परिसरात टाकून दिल्याचे निदर्शनास आल्याने या उपक्रमाशी संबंधीत जिल्हा स्वच्छता अभियानचे प्रमुख  अमोल जाधव यांना या पुनर्वापर करता येण्यासारख्या वस्तु या रितसर पध्दतीने भांडारात जमा करण्याबाबत ज्या वस्तु किंवा साहित्य निरुपयोगी आहे त्याची विहित पध्दतीने विल्हेवाट करणेबाबतही सुचीत केलेले आहे.

यशवंतनगर परिसराच्या अचानक भेटीने  आव्हाळे यांनी स्वच्छतेबाबत परिषदेचे प्रशासन, संबंधीत मक्तेदार या सोबतच या परिसर व निवासस्थाने वापरणा-या अधिकारी व कर्मचारीचीही समान जबाबदारी असलेबाबतचा संदेश दिलेला आहे.

पाहणीदरम्यान आव्हाळे यांनी बांधकाम विभागातील ड्रेसर विठ्ठल म्हंते यांच्या निवासस्थानी जाऊन इमारतीची पाहणी केली. यावेळी म्हंते यांनी चहापानसाठी निमंत्रण दिले परंतु आव्हाळे यांनी ते नम्रपणे नाकारले.