सोलापूर :मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे यांनी तब्बल 17 दिवस उपोषण केले. सरकारला आरक्षण देण्यासाठी 40 दिवसांची मुदत देवूनही याबाबत विचार केला नसल्याने जरांगे पाटील यांनी पुन्हा आमरण उपोषणाचा मार्ग स्विकारला असून, त्यांच्या समर्थनार्थ आज (दि. 25) सोलापूर शहरातही मराठा समाजबांधवांनी जिल्हा परिषद गेटसमोर बेमुदत साखळी उपोषण सुरू केले आहे. दरम्यान, या उपोषणकर्त्यांनी केलेल्या घोषणाबाजीने जिल्हा परिषद परिसर दणाणून गेला. यावेळी अनेक मराठा समाजबांधवांनी आपल्या भावना व्यक्त केल्या…अन् आरक्षण मिळेपर्यंत माघार घ्यायची नाही, असा निर्धार केला.
जिल्ह्यातील काही तालुक्यात, विविध गावात हे बेमुद साखळी उपोषण मराठा बांधवांकडून करण्यात आले आहे. काही गावात तर मंत्र्यांना गावबंदीचे डिजीटल झळकले आहेत. जरांगे पाटलांचे पुढील आदेश येईपर्यंत हे साखळी उपोषण चालूच ठेवणार असल्याचे मराठा समाज बांधवांनी यावेळी सांगितले. दरम्यान, आरक्षण मिळेपर्यंत सोलापूर शहरात सार्वजनिक किंवा राजकीय कार्यक्रम घेण्यासाठी कोणत्याही पक्षाचा नेता, एखादा मंत्री, खासदार आला तर त्यांचा कार्यकम उधळून लावण्यासाठी मराठा समाजाबांधव प्रयत्न करतील, असाही रोखठोक इशारा माऊली पवार यांनी दिला. या बेमुदत साखळी उपोषणासाठी माऊली पवार यांच्यासह राजन भाऊ जाधव, मनोहर सपाटे, कुमार माने, नाना काळे, महादेव गवळी, औदुंबर जगताप, सुधीर आसबे, शाम गांगर्डे, सुनील कदम, जगू भोसले, मतीन बागवान, प्रा. गणेश देशमुख, विजय पोखरकर, अविनाश मुळीक, सचिन कदम, विनोद भोसले आदींसह इतरही मराठा समाजबांधव उपस्थित होते.