August 25, 2026

Solapur Samachar

Latest Marathi News

गोष्ट जिल्हा परिषदेच्या शाळेतील 19 विद्यार्थ्यांच्या हृदयांची

सोलापूर : जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मा. कुशल जैन यांच्या मार्गदर्शनाखाली सोलापूर जिल्ह्यातील गरजू बालकांना मोफत हृदयरोग शस्त्रक्रियेची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली. राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम, जिल्हा शीघ्र हस्तक्षेप निदान व उपचार केंद्र (DEIC), जिल्हा रुग्णालय सोलापूर तसेच बालाजी हॉस्पिटल, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात आलेल्या या उपक्रमांतर्गत आतापर्यंत 19 बालकांवर यशस्वी हृदयरोग शस्त्रक्रिया करण्यात आली असून सर्व बालके उपचारानंतर सुखरूपपणे आपल्या घरी परतली आहेत.
मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन यांनी पुढाकार घेत पालकांशी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे थेट संवाद साधला. पालकांच्या अडचणी समजून घेत त्यांना उपचाराचे महत्त्व पटवून दिले, त्यांच्या मनातील भीती दूर केली आणि विश्वास देत आपल्या पाल्यांना उपचारासाठी मुंबईला पाठविण्यास राजी केले. दि. 11 ऑगस्ट रोजी मोफत हृदयरोग शस्त्रक्रियेसाठी 18 बालकांना बसद्वारे मुंबई येथील बालाजी हॉस्पिटलमध्ये पाठविण्यात आले होते. त्यापूर्वीच्या बालकांसह आतापर्यंत एकूण 19 बालकांवर यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. शस्त्रक्रियेनंतर बालकांची प्रकृती सुधारली असून, त्यांच्या पालकांसह ते सुखरूप घरी परतले आहेत.

या उपक्रमाची आणखी एक महत्त्वाची बाब म्हणजे बालकांच्या उपचारासाठी पालकांना मुंबई येथे जाणे, राहणे, जेवण-नाश्ता तसेच उपचारानंतर परतीचा प्रवास यासाठी कोणताही खर्च करावा लागला नाही. संपूर्ण व्यवस्था मोफत करण्यात आल्याने आर्थिकदृष्ट्या अडचणीत असलेल्या कुटुंबांना मोठा दिलासा मिळाला आहे.
या उपक्रमासाठी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सतीश कोपुरवाड, शिक्षण विभागातील कर्मचारी, राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम व DEIC केंद्रातील अधिकारी-कर्मचाऱ्यांनी विशेष प्रयत्न केले.