August 20, 2026

Solapur Samachar

Latest Marathi News

झेडपीचे पदाधिकारी व विभाग प्रमुखांच्या तक्रारीची घेतली दखल

सोलापूर : जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत पदाधिकारी, सदस्य व विभाग प्रमुखांच्या तक्रारीनंतर मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन हे ॲक्शन मोडवर आले आहेत. विभागांचा कारभार सुधारण्यासाठी वादग्रस्त कर्मचारी व गरजेच्या ठिकाणी अतिरिक्त कर्मचारी देऊन प्रशासनात मोठे फेरबदल करण्याचे काम त्यांनी हाती घेतले आहे.

जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा गेल्या आठवड्यात झाली. या सभेत पदाधिकारी, सदस्य जिल्हा परिषदेच्या कारभारावर आक्रमक होताना दिसून आले. सभेत आलेल्या विषयाच्या अनुषंगाने सीईओ कुशल जैन हे गंभीर झाले आहेत. माढ्याचे सभापती पंडित देशमुख यांनी अत्यंत मार्मिक भाषेत जिल्हा परिषदेच्या कारभारावर तिखटपणे भाष्य केले. पंधरा वर्षे एकच कर्मचारी एका ठिकाणी काम करतोय. हाच का जिल्हा परिषदेचा कारभार. जनसेवा हीच ईश्वरसेवा हे जिल्हा परिषदेचे ब्रीद आहे. या ब्रीद प्रमाणे कर्मचारी वागतात का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला होता. जिल्हा परिषदेचा कारभार पाहून मी राजकारणात कशासाठी आलो असा मला पश्याताप होत आहे अशी नाराजी त्यांनी व्यक्त केली होती. प्रवीण तानवडे, दादासाहेब लवटे, आदिनाथ देशमुख आणि महिला सदस्यही आक्रमक होताना दिसून आले. ग्रामसेवक भुजबळ यांच्या कारभाराची चौकशी करण्यासाठी चालढकल होत असल्याचा आरोप करण्यात आला. सदस्यांच्या या तक्रारीवर सीईओ जैन यांनी विभाग प्रमुखांशी चर्चा केली आणि त्यानुसार प्रशासनात मोठे बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. प्रशासन, आरोग्य, शिक्षण, समाजकल्याण, लेखा विभागात मोठा बदल करण्याचे काम त्यांनी हाती घेतल्याचे सांगण्यात आले. तक्रारी आलेल्या कर्मचाऱ्यांची इतरत्र बदली करण्यात येत आहे. समाज कल्याण आणि आरोग्य विभाग नागरिकांच्या सुविधासाठी कमी पडत असल्यामुळे त्या ठिकाणी आता अतिरिक्त कर्मचारी देण्यात येणार आहेत. मुख्य औषध भंडारातील फार्मशिष्ट नियुक्तीचा वाद रंगला आहे. असे सर्व वादग्रस्त विषयात हात घालून प्रशासनाचा गाडा वेगाने चालवा यासाठी त्यांनी मोहीम उघडल्याचे सांगण्यात आले. या आठवडाभरात प्रशासनात चांगलेच फेरबदल दिसतील असे चित्र आहे.