सोलापूर : विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम (SIR) अंतर्गत मतदार यादीचे काम करताना सर्व अधिकारी-कर्मचाऱ्यांनी परस्परांमध्ये समन्वय ठेवून एक टीम म्हणून काम करावे. मतदार हाच केंद्रबिंदू असून प्रत्येक पात्र मतदाराचे नाव अंतिम मतदार यादीत समाविष्ट होईल, याची दक्षता घ्यावी. आगामी ४ नोव्हेंबर रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होणार असल्याने प्रत्येक टप्प्याचे काटेकोर नियोजन करून विहित मुदतीत काम पूर्ण करावे, अशा सूचना मतदार यादी निरीक्षक तथा विभागीय आयुक्त शीतल तेली-उगले यांनी दिल्या.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात एसआयआर अंतर्गत सर्व मतदान नोंदणी अधिकारी यांची आढावा बैठक घेण्यात आली, त्याप्रसंगी श्रीमती तेली उगले मार्गदर्शन करत होत्या. यावेळी जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन, अप्पर आयुक्त तुषार ठोंबरे, निवासी उपजिल्हाधिकारी अभिजीत पाटील, सोलापूर महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी लक्ष्मण कसेकर, मतदार नोंदणी अधिकारी सुमित शिंदे, अमित माळी, सीमा होळकर, अंजली मरोड, जयश्री आव्हाड, सदाशिव पडदुने, सचिन इथापे, सुशांत बनसोडे, अमोल सिंह भोसले, उपस्थित होते. मतदार यादी निरीक्षक श्रीमती तेली पुढे म्हणाल्या की, एसआयआरच्या प्रत्येक टप्प्याबाबत अधिकाऱ्यांनी सखोल अभ्यास करून काम करण्याची आवश्यकता आहे. अधिकाऱ्यांनी परस्परांमध्ये नियमित संवाद ठेवावा. एसआयआर अंतर्गत एखाद्या विषयाची माहिती नसेल तर त्याबाबत योग्य माहिती घेऊनच पुढील कार्यवाही करावी. अपुरी अथवा चुकीची माहिती देणे टाळावे, असे त्यांनी स्पष्ट केले.
दावे-हरकतींच्या सुनावणीचे नियोजन करा
प्रारूप मतदार यादीवर प्राप्त होणाऱ्या दावे व हरकतींवर सुनावणी घेण्यासाठी स्वतंत्र आणि नियोजनबद्ध वेळापत्रक तयार करावे. संबंधितांना सुनावणीच्या नोटिसा बजावताना उपलब्ध असलेल्या विविध माध्यमांचा प्रभावी वापर करावा. आवश्यकतेनुसार व्हॉट्सॲप संदेशाचाही वापर करून संबंधितांपर्यंत सूचना पोहोचवाव्यात, असे त्यांनी सांगितले.
सुनावणीच्या वेळी एखाद्या मतदाराच्या नागरिकत्वाबाबत शंका निर्माण झाल्यास संबंधित कागदपत्रांची योग्य प्रकारे तपासणी करावी. मतदार यादीतील माहितीच्या अचूकतेबरोबरच प्रक्रियेची पारदर्शकता कायम ठेवावी. ईआरओ डॅशबोर्डवरील माहिती सुरक्षित ठेवण्याची विशेष दक्षता घ्यावी, अशा सूचनाही त्यांनी दिल्या.
फॉर्म ७ व ८ च्या गैरवापर नको
मतदार यादीत बदल अथवा नाव वगळण्याच्या प्रक्रियेत नियमांचे काटेकोर पालन करावे. बल्कमध्ये अर्ज स्वीकारू नयेत. फॉर्म क्रमांक ७ व ८ चा गैरवापर होणार नाही, यासाठी विशेष दक्षता घ्यावी. मृत व्यक्तीचे नाव मतदार यादीतून वगळताना संबंधित मृत्यू प्रमाणपत्राची तपासणी करूनच आवश्यक ती कार्यवाही करावी, असे तेली-उगले यांनी स्पष्ट केले.
तसेच, प्रत्येक मतदार नोंदणी अधिकाऱ्याने आपल्या कार्यक्षेत्रातील व्हीआयपी मतदारांची यादी स्वतः तपासावी, अशी सूचनाही त्यांनी केली. एसआयआर अंतर्गत कागदपत्रांची तपासणी करण्यासाठी जिल्हास्तरीय समितीची तातडीने स्थापना करावी, असे निर्देशही मतदार यादी निरीक्षक शीतल तेली-उगले यांनी दिले. अंतिम मतदार यादी अचूक, पारदर्शक आणि सर्वसमावेशक करण्यासाठी सर्व संबंधित अधिकारी-कर्मचाऱ्यांनी समन्वयाने काम करावे. विहित कालावधीत प्रत्येक प्रक्रिया पूर्ण करण्यासोबतच पात्र मतदारांचा मताधिकार अबाधित राहील, याची विशेष दक्षता घ्यावी, असे त्यांनी यावेळी सांगितले.
नवमतदारांची नोंदणी करा
नवीन मतदार नोंदणीसाठी व्यापक जनजागृती मोहीम राबविण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या. १८ ते १९ वर्षे वयोगटातील नवमतदारांची नोंदणी वाढविण्यासाठी महाविद्यालयांना भेटी देऊन पात्र विद्यार्थ्यांची मतदार म्हणून नोंदणी करावी. पात्र असूनही एकही नागरिक मतदार नोंदणीपासून वंचित राहणार नाही, यासाठी स्थानिक पातळीवर नियोजन करून विशेष जनजागृती उपक्रम राबवावेत, असे त्यांनी सांगितले. यावेळी जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांनी जिल्हा प्रशासनाने एसआयआर अंतर्गत केलेल्या कामकाजाची सविस्तर माहिती बैठकीत सादर केली. तसेच अप्पर आयुक्त तुषार ठोंबरे यांनीही मार्गदर्शन केले.

More Stories
पंढरपूर एमएसईबीच्या अभियंत्याला कारणे दाखवा नोटीस बजावण्याचे पालकमंत्र्यांचे आदेश
आरोग्य केंद्रात हवा पुरेसा औषधसाठा; सभापती चेतनसिंह केदार यांची सूचना
सीईओंकडे गेलेल्या फायली प्रलंबित राहत असल्याबद्दल सोलापूर झेडपी सभेत नाराजी