September 3, 2026

Solapur Samachar

Latest Marathi News

सीईओंकडे गेलेल्या फायली प्रलंबित राहत असल्याबद्दल सोलापूर झेडपी सभेत नाराजी

सोलापूर : जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे मंजुरीसाठी गेलेल्या फायली प्रलंबित राहत असल्याबद्दल स्थायी सभेत सदस्यांनी त्रिव्र नाराजी व्यक्त केली. सदस्यांचा रोख पाहून जिल्हा परिषदेचे अध्यक्ष दीपक वैद्य यांनी सीईओ कुशल जैन यांनी याप्रकरणी लक्ष घालून सदस्यांची कामे वेळेत मार्गी लागतील याकडे लक्ष द्यावे अशा सूचना केल्या.

जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीची सभा अध्यक्ष दीपक वैद्य यांच्या अध्यक्षतेखाली झाली. सभेला जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष इंद्रजीत पवार यांच्यासह सर्व विषय समितीचे सभापती, सदस्य व अधिकारी उपस्थित होते. या सभेत सदस्यांनी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे गेलेल्या पाहिली वेळेवर मार्गी लागत नसल्याबद्दल नाराजी व्यक्त केली. जिल्हा परिषदेचे प्रशासन अजून प्रशासक काळातच असल्यासारखे वागत असल्याबद्दल सदस्याने त्रिवार नाराजी व्यक्त केली. पदाधिकाऱ्यांचे अधिकारी ऐकत नसतील तर मग मात्र वेगळा विचार करावा लागेल असा इशारा सदस्याने आक्रमक होत दिला. त्यावर अध्यक्ष दीपक वैद्य यांनी हस्तक्षेप करीत सर्व सदस्यांची समजूत घालत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन यांना कार्यपद्धतीत सुधारणा करण्याबाबत सूचना दिल्याचे सांगण्यात आले.

पटेल कुठे असतो? 

शिक्षण विभागातील बांधकाम विभागाचे कामे पाहणारा लिपिक पटेल हा जागेवरच बसत नसल्याबद्दल सदस्यांनी अधिकाऱ्यांना फैलावर घेतले. शाळेची बांधकामे तो ठरवतो. धोकादायक इमारतीबाबत त्याला जबाबदार धरा अशी नाराजी सदस्यांनी व्यक्त केली. शिक्षण आरोग्य व इतर विभागातील कर्मचाऱ्यांनाबाबत सभेत गंभीर चर्चा झाल्याचे सांगण्यात आले. सभेच्या कामकाजाबाबत अध्यक्ष वैद्य हे सविस्तर माहिती देणार आहेत.

सदस्यांना दिलासा….

सध्या जिल्हा परिषदेमार्फत जन सुविधा नागरी सुविधा आणि समाज कल्याण विभागाच्या विविध विकास कामांना मंजुरी देण्याचे कामकाज सुरू झाले आहे. ही सर्व कामे जिल्हा परिषदस्तरावर होणार असल्याने ग्रामपंचायतस्तरावर सरपंचांना काहीच मिळणार नसल्याबाबत नाराजी व्यक्त करण्यात आली. त्यामुळे जनसुविधाची कामे ग्रामपंचायत स्तरावर करण्याचे या सभेत ठरले.