September 10, 2026

Solapur Samachar

Latest Marathi News

सोलापूर झेडपी स्थायी समितीचा दणका; आरोग्यातील 35 परिचराना मिळाली पदोन्नती

सोलापूर : जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीमध्ये झालेल्या वादळी चर्चेनंतर आरोग्य विभागातील 35 परिचरना पदोन्नती देण्यात आली आहे.

जिल्हा परिषदेचे अध्यक्ष दीपक वैद्य यांच्या अध्यक्षतेखाली स्थायी समितीची नुकतीच सभा झाली. या सभेत आरोग्य विभागातील 35 परिचारांना शासन नियमाप्रमाणे पदोन्नती देणे अपेक्षित असताना प्रक्रिया राबवली जात नसल्याबाबत विविध संघटनांनी पदाधिकाऱ्यांना निवेदन देऊन आंदोलनाचा इशारा दिला होता. या प्रश्नावर स्थायी समितीच्या सभेत चर्चा झाली. अध्यक्ष वैद्य यांनी तात्काळ ही पदोन्नती लागू करण्याचे आदेश दिले. त्याप्रमाणे आरोग्य विभागाच्या प्रस्तावानुसार प्रशासन विभागाने ही प्रक्रिया पारदर्शकपणे पार पाडली आहे. स्थायी समितीच्या दणक्यानंतर या 35 परिचारांना न्याय मिळाला आहे. याबद्दल जिल्हा परिषद कर्मचाऱ्यातून समाधान व्यक्त होत आहे.

शासनाने पदोन्नतीचा निर्णय घेऊन बराच कालावधी लोटला होता. राज्यातील इतर जिल्हा परिषद प्रशासनाने ही प्रक्रिया यापूर्वीच राबवली आहे. जिल्हा परिषद प्रशासनास वर्ग चार संवर्गातून आरोग्य सेवक वर्ग 3 मध्ये पदोन्नती लवकरात लवकर करण्यात यावी यासाठी विविध संघटनांनी निवेदन दिले होते. स्थायी सभेत निर्णय झाल्यानंतर 35 परिचरांना आरोग्य सेवक पदावर समुपदेशनाने पदोन्नती मिळाली आहे. जिल्हा परिषदेचे अध्यक्ष दीपक वैद्य, उपाध्यक्ष इंद्रजीत पवार, आरोग्य व शिक्षण सभापती चेतनसिंह केदार यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन, प्रशासन विभागाचे प्रभारी उपमुख्य कार्यकारी अधिकारी सूर्यकांत भुजबळ, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ सतीश कोपूरवाड यांनी ही प्रक्रिया पार पडल्याबद्दल समाधान व्यक्त होत आहे.