सोलापूर : नांदेड येथे सहायक पोलीस निरीक्षक म्हणून कार्यरत असलेले आनंद मळाळे यांनी शनिवारी पहाटे सोलापुरातील स्वतःच्या राहत्या घरी रिव्हॉल्व्हरमधून गोळी झाडून घेऊन आत्महत्या केली.
सहाय्यक पोलीस निरीक्षक पदावर आनंद मळाळे (बिलोली) नांदेड येथे कार्यरत होते. गेल्या महिन्याभरापासून आनंद मळाळे हे आजारी रजेवर सोलापूरला घराकडे आले होते. ड्युटीवर असताना त्यांचा अपघात झाला होता. डोक्याला मार लागल्याने उपचार घेऊन ते घरी परतले होते. शनिवारी पहाटे चारच्या सुमाराला मळाळे यांनी घराच्या अंगणामध्ये स्वतःकडील रिव्हॉल्व्हरने डोक्यामध्ये गोळी झाडून घेऊन घेतली. यात ते जागीच मरण पावले.घरातून ते कुठे गेले म्हणून त्यांची पत्नी शोध घेताना घराच्या बाहेर अंगणात मृतावस्थेत आढळून आले. या घटनेची माहिती कळताच पोलीस उपायुक्त विजय कबाडे, सहाय्यक पोलीस आयुक्त राजू मोरे यांच्यासह इतर अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट माहिती घेतली.
सहाय्यक पोलीस निरीक्षक आनंद मळाळे यांनी गोळी झाडून घेण्यापूर्वी चिट्ठी लिहिल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. त्यांच्या मागे पत्नी, मुलगा असा परिवार आहे. या घटनेची नोंद सदर बझार पोलिस ठाण्यात झाली आहे. मळाले हे सोलापूर शहर पोलीस आयुक्तालयमध्ये अनेक वर्ष पोलीस कॉन्स्टेबल म्हणून कार्यरत होते. परीक्षा देऊन ते फौजदार झाले. त्यांनी सोलापूर शहर वाहतूक शाखा आणि सदर बझार पोलीस ठाणे या ठिकाणी सेवा बजावली आहे. पुणे येथे फौजदार म्हणून सेवा बजावल्यानंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक म्हणून नांदेड येथे त्यांची पदोन्नती झाली होती. आत्महत्या करण्यापूर्वी त्यांनी लिहलेल्या चिट्ठी काय आहे? याचा खुलासा झाल्यानंतर पोलिसांचा पुढील तपास होणार आहे.