सोलापूरजिल्हा परिषद

राज्यातील सर्व महिलांना लखपती दीदी बनविणार: जयकुमार गोरे 

सोलापूर : राज्यातील सर्व महिलांच्या सक्षमीकरणासाठी राज्य शासन महिलांच्या पाठीशी ठामपणे उभे आहे. उमेदच्या माध्यमातून राज्यातील सर्व महिलांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. या माध्यमातून सर्व महिलांना लखपती दीदी बनवण्याची ग्वाही राज्याचे ग्रामविकास व पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी दिली.

नॉर्थकोर्ट मैदान येथे ग्रामविकास व पंचायत राज विभाग जिल्हा परिषद सोलापूर, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा सोलापूर उमेद, महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान आयोजित रुक्मिणी महोत्सव व मिनी सरस जिल्हास्तरीय विक्री व प्रदर्शन या कार्यक्रमाचे दीप प्रज्वलन करून उद्घाटन पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्याहस्ते करण्यात आले. यावेळी आमदार देवेंद्र कोठे, महापौर विनायक कोंड्याल, जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, महापालिका आयुक्त सचिन ओंबसे, मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम, जिल्हा परिषद सदस्य चेतन केदार ,नगरसेविका रोहिणी तडवळकर, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रनेचे प्रकल्प संचालक चंद्रशेखर जगताप उपस्थित होते.

यावेळी बोलताना पालकमंत्री  गोरे म्हणाले की, महिला बचत गटांनी स्वतः उत्पादित केलेल्या मालांचे वस्तूची विक्री व प्रदर्शन करण्यासाठी हक्काची बाजारपेठ मिळावी म्हणून हा मिनी सरस जिल्हा रुक्मिणी महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. महिलांची आर्थिक बळकटी व सक्षमीकरणासाठी हा महोत्सव घेण्यात येतो. उमेदच्या माध्यमातून देशाचे पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशातील महिला स्वतःच्या पायावर उभ्या राहाव्या, त्यांना सन्मानाने जगता यावे यासाठी उमेदच्या माध्यमातून प्रयत्न केले जातात, असे सांगितले. तसेच महिला बचत गटाच्या माध्यमातून नवनवीन मोठे उद्योग महिलांनी निर्माण करावे, तसेच प्रत्येक गावागावांमधून महिला बचत गटाच्या माध्यमातून प्रत्येक गावी एक प्रभाग संघ निर्माण व्हावा अशी भूमिका ठेवून आपण सर्वांनी काम करावे. गावातील दूध व्यवसाय करणाऱ्या महिलांनी स्वतःची दूध बँक तयार करावी. शेळ्या, मेंढ्या व गाई पालन हा व्यवसाय सर्वात जास्त पैसा मिळवून देणारा ग्रामीण भागातील व्यवसाय आहे. महिलांनी बचत गटाच्या माध्यमातून उत्पादित केलेल्या मालाला चांगले पॅकिंग केले तर चांगला पैसा मिळतो. महिलांच्या उत्पादित मालाला हक्काची बाजारपेठ मिळण्यासाठी सोलापूर जिल्ह्यासाठी उमेद मॉल मंजूर केला गेला आहे, अशी ही माहिती पालकमंत्री गोरे यांनी दिली. उमेद मॉलमुळे सोलापूर जिल्ह्यातील महिलांच्या उत्पादित वस्तूंसाठी बारा महिने हक्काची बाजारपेठ मिळणार आहे . राज्यातील जवळपास सर्व जिल्ह्यात मुख्यमंत्री फडणवीस यांनी असे मॉल मंजूर केले आहेत. तसेच गावांमध्ये महिला बचत गटाच्या बैठकीसाठी हक्काचे कार्यालय निर्माण करून देण्याचा प्रस्ताव आम्ही शासनाकडे सादर करणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

कर्ज वाटप धनादेश वितरण 

कार्यक्रमाच्या उद्घाटनानंतर महिला बचत गटांनी केलेल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल बक्षीस वितरण करण्यात आले. यामध्ये महिला स्वयंसहायता समूहांना समुदायिक गुंतवणूक निधी 32 कोटी 9 लाख 40 हजार रुपयेचा धनादेश देण्यात आला, तसेच महिला स्वयं सहायता समूह बँक कर्जवाटप 2 कोटी 25 लाख रुपयांचा धनादेश वितरित करण्यात आला. उमेद अंतर्गत महाराष्ट्र राज्यातील पहिल्या महिला फेडरेशनच्या नोंदणी पत्राचे वितरण करण्यात आले. सन 2025 – 26 अंतर्गत वार्षिक कृती आराखडा मधील सर्व उद्दिष्ट पूर्ण केल्याबद्दल प्रत्येक तालुका अभियान व्यवस्थापन कक्षाचा प्रमाणपत्र देऊन सत्कार पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते करण्यात आला.  त्यानंतर पालकमंत्री गोरे यांनी महोत्सवातील प्रत्येक स्टॉलला भेट देऊन पाहणी केली. या महोत्सवात महिला बचत गटांचे 80 स्टॉल लागलेले आहेत. सोलापूर जिल्ह्यातील जास्तीत जास्त नागरिकांनी या स्टॉलला भेट देऊन महिला बचत गटांनी उत्पादित केलेल्या वस्तूंची खरेदी करावी, असे आवाहन करण्यात आले. हे प्रदर्शन नॉर्थ कोर्ट मैदान येथे दिनांक 1 ते 5 मार्च या कालावधीत आहे. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन व समारोप प्रकल्प संचालक जगताप यांनी केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button