सोलापूर : सोलापूर लोकसभा मतदारसंघ अखेर भाजपाच्या ताब्यातून गेला आहे. काँग्रेस आघाडीच्या उमेदवार आमदार प्रणिती शिंदे या अखेर खासदार झाल्या आहेत. सोलापूर लोकसभा मतदारसंघात भाजपचे चार आमदार असूनही व भाजपच्या बालेकिल्ल्याचे अक्कलकोटचे आमदार व जिल्हाध्यक्ष सचिन कल्याणशेट्टी यांच्या कार्यपद्धतीवर आता प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
दोन टर्मनंतर सोलापूर लोकसभा मतदारसंघ भाजपच्या ताब्यातून काँग्रेसने पुन्हा हिरावून घेतला आहे. माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या दोन वेळचा पराभवाचा वचपा त्यांची कन्या आमदार प्रणिती शिंदे यांनी काढला आहे. निवडणूक प्रचारातील ‘सोलापूरची लेक” हा त्यांचा उल्लेख भावनिक ठरला. उमेदवारी घोषित होण्यापूर्वीच माजी केंद्रीय गृहमंत्री सुशील कुमार शिंदे व त्यांची लेक, आमदार प्रणिती शिंदे यांनी मतदारसंघ पिंजून काढला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लाटेला भेदत त्यांनी आपल्या कार्याचा ठसा दाखवत लोकांच्या भावनेला हात घातला. अत्यंत अटीतटीच्या लढतीत आमदार प्रणिती शिंदे यांनी लोकसभा सर केली आहे. विशेष धक्कादायक बाब म्हणजे सोलापूर लोकसभा मतदारसंघात भाजपचे सचिन कल्याणशेट्टी, सुभाष देशमुख, विजयकुमार देशमुख आणि समाधान आवताडे असे चार आमदार, मित्र पक्षाचा एक आमदार यशवंत माने व प्रशांत परिचारक, राजन पाटील दोन माजी आमदार अशी मोठी यंत्रणा असताना भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या नियोजनाला धक्का देणारा जनतेचा कौल पुढे आला आहे. अक्कलकोट विधानसभा मतदारसंघ भाजपचा बालेकिल्ला समजला जात होता. पण या बालेकिल्लातच भाजपला धक्का बसला आहे. या मतदारसंघातून काँग्रेसच्या उमेदवाराला चांगले मतदान झाले आहे. त्यामुळे कल्याणशेट्टी यांच्या कामगिरीवर आता प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. भाजपच्या उमेदवाराला लाखाचे लीड देण्याचा त्यांचा दावा फोल ठरला आहे. स्थानिक भाजपच्या नेत्यांना विश्वासात न घेता एक कलमी यंत्रणा राबविल्याचा हा फटका असल्याचा आरोप आता केला जात आहे.
देशभर भाजपला असे फटके बसले असले तरी सोलापूर जिल्ह्यातील दोन्ही मतदारसंघ भाजपने गमावले आहेत. माढा लोकसभा मतदारसंघातही भाजपचे खासदार रणजीतसिंह नाईक- निंबाळकर यांना पराभवाला सामोरे जावे लागत आहे. शरद पवार गटाचे धैर्यशील मोहिते- पाटील यांना या मतदारसंघात मोठे यश मिळाले आहे. माढ्याचे आमदार बबनदादा शिंदे, करमाळ्याचे आमदार संजयमामा शिंदे, सांगोल्याचे आमदार शहाजीबापू पाटील यांचे मोठी फौज दिमतीला असूनही भाजपला पराभव पत्करावा लागला आहे. त्यामुळे आता भाजपच्या नेत्यांना आत्मपरीक्षणाची वेळ आली आहे. आम्ही विकास केला याच जोरावर मतदान मिळेल या भ्रमात राहिले भाजपचे पदाधिकारी.
ही आहेत पराभवाची कारणे…
सोलापूर जिल्ह्यातील सोलापूर व माढा हे दोन्ही लोकसभा मतदारसंघ भाजपने गमावले आहेत. त्याची प्राथमिक कारणे पुढील प्रमाणे असल्याचे सांगितले जात आहे. उमेदवारीची मागणी केलेली असतानाही मोहिते- पाटील यांना डावलने, सोलापूर लोकसभा मतदारसंघात स्थानिक उमेदवाराची मागणी होत असताना सातपुते यांची उमेदवारी माथी मारणे, भाजपमधील दबावतंत्र, सत्तेसाठी फोडाफोड, महागाई, शेतकरी विरोधी धोरणे, बेकारी, स्थानिक प्रश्न, कांद्याचे भाव पाडणे, मराठा आरक्षणाचा प्रभाव मतदारावर दिसून आला.

More Stories
सोलापूरच्या वाहन मालकाकडून 35 हजाराची लाच घेताना पुण्याचा फौजदार अटकेत
युरोपमधील “पॅरिसमहल’ मध्ये शेतकऱ्यांनी साजरी केली शिवजयंती
सोलापूर महापालिकेत सत्तेत आलेल्या भाजपाला पहिल्याच सभेत नामुष्की