September 10, 2026

Solapur Samachar

Latest Marathi News

अभिनंदन: वारी विनावाद टेंडर, स्वच्छतागृह, जर्मन हँगरची सुविधा; क्रेडिट गोज टू कोहीणकर

सोलापूर : सलग दुसऱ्यावर्षी आषाढी वारीत सुलभ शौचालय, पिण्याचे पाणी, जर्मन हँगर, वॉटरप्रूफ मंडप, स्वागत कमानीची व्यवस्था चोखपणे बजावणाऱ्या जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर यांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सन्मान केला.

आषाढी वारी म्हटले की पालखी मार्गावर वारकऱ्यांसाठी सुविधा आल्याच. पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी पालखी मार्गावर पायी चालत येणाऱ्या वारकऱ्यांसाठी सुविधा मोठ्या प्रमाणावर उपलब्ध करण्याची यंत्रणा राबवली. त्यांच्या संकल्पनेतूनच पालखी मार्गावर वारकरी मुक्कामाच्या ठिकाणी जर्मन हँगर व वॉटरप्रूफ मंडपची सुविधा सलग दुसऱ्या वर्षी राबविण्यात आली. कडाक्याचे ऊन व पावसापासून वारकऱ्यांना चांगली सुविधा मिळाली. ही यंत्रणा राबविण्याची जबाबदारी गेल्या दोन वर्षापासून जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर यांच्यावर आली. गतवर्षी सोलापूर जिल्हा परिषदेने चांगले काम केल्यामुळे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी पुणे, सातारा व सोलापूर या तिन्ही जिल्ह्याची जबाबदारी सोलापूर जिल्हा परिषदेवर दिली. कोहिनकर यांनी ही जबाबदारी निर्विघ्नपणे पार पाडली. विशेष म्हणजे पुणे जिल्हा परिषदेकडून शौचालयाचे टेंडर काढताना बरेच वाद निर्माण होत. पण यंदा प्रथमच सोलापूर जिल्हा परिषदेने ही प्रक्रिया राबविली. विनावाद टेंडर प्रक्रिया यंदा पार पाडली. पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी याचे श्रेय कोहिनकर यांना दिले. तसेच पालखी मार्गावरील स्वच्छतागृह, जर्मन हँगर, रस्ते, टँकर याची वेळीच व्यवस्था लावणे, यंत्रणेचा पाठपुरावा करणे याची जबाबदारी यशस्वीपणे पार पाडल्याबद्दल अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर यांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याहस्ते पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. याप्रसंगी पालकमंत्री जयकुमार गोरे, आमदार समाधान आवताडे उपस्थित होते. अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर यांनी याचे श्रेय जिल्हा परिषदेचे पदाधिकारी, अधिकारी व कर्मचाऱ्यांना दिले. सर्व यंत्रणांच्या एकजुटीमुळे वारी यशस्वीपणे पार पाडल्याचे त्यांनी नमूद केले.