सोलापूर : सोलापूर विजयपूर महामार्गावरील तेरामैलजवळ शेतात साठलेले पाण्याचे तळे पाहून तुम्हाला वाटेल पाऊस किती मोठा झाला? हो येथून येणारे -जाणारे असेच फसत आहेत. पण हे पाणी पावसाचे नाही तर पाईपलाईनच्या गळतीचे आहे.

बुधवार दि. 3 जुलै रोजी दुपारी तीन वाजेच्या सुमारास सोलापुरात पाऊस झाला. विजयपूर महामार्गावरही पावसाचे ढग मोठ्या प्रमाणावर दिसत होते. कालांतराने हा पाऊस सर्वत्र फिरत गेला. त्यामुळे रस्त्यावर पाणीच पाणी झाले. पण विजयपूर महामार्गावरून सोलापूरला येणाऱ्या वाटसरूंना तेरामैलकॉर्नर ते होनमुर्गी फाट्यादरम्यान शेतात पाण्याचे तळे साचलेले दिसले. त्यामुळे या परिसरात फार मोठा पाऊस झाला असे ते एकमेकांना फोन करून सांगू लागले. त्यामुळे जो तो तुमच्याकडे किती पाऊस झाला? असे विचारू लागला.  पण सर्वांनी आमच्याकडे किरकोळ स्वरूपाचा पाऊस झाला आहे असे एकमेकांना सांगू लागले. मग होनमुर्गी फाट्याजवळ शेतात तळे कसे ?असे सर्वांनाच प्रश्न पडला. एवढ्याच भागात ढगफुटी झाली की काय अशी शंका काही ना आली. त्यामुळे तेथून जाणाऱ्या- येणाऱ्यांनी खातरजमा केल्यावर हे तळे पावसाच्या पाण्याचे नसून सोलापूर महानगरपालिकेच्या जलवाहिनीतून गळती झालेल्या पाण्याचे असल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर सर्वांनी सुटकेचा श्वास घेतला.

सोलापूर महानगरपालिकेला टाकळी पंपिंग हाऊसमधून पाण्याचा उपसा करून पाणीपुरवठा केला जातो. यासाठी टाकळी ते सोरेगाव जलशुद्धीकरण केंद्र दरम्यान जलवाहिनी टाकण्यात आली आहे. तेरामैलजवळ देशमुखवस्तीशेजारील वालमधून पाण्याची मोठ्या प्रमाणात गळती सुरू झाली आहे. त्यामुळे हे पाणी आजूबाजूच्या शेतातील पिकात वाहून गेल्याने तळे साचले आहे. महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागाला ही माहिती मिळाल्यावर गुरुवारी सकाळी पथक दुरुस्तीसाठी येथे पोहोचले आहे. या गळतीमुळे सोलापूरच्या पाणीपुरवठ्यावर परिणाम होण्याची शक्यता असल्याचे सांगण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *