सोलापूर: लोकसभा निवडणूक निकालाच्यानंतर संपूर्ण राज्यामध्ये मनोज जरांगे- पाटील फॅक्टरची जोरदार चर्चा झाली. निकालानंतर जरांगे पाटील यांनी मराठा जागृती शांतता रॅलीची सुरुवात केली आणि त्यास अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला. पहिल्या टप्प्यातील रॅली संपलेली असून पश्चिम महाराष्ट्रातील मराठा रॅलीची सुरुवात सोलापुरातून होणार असल्याची माहिती मनोज जरांगे पाटील यांनी आज अंतरवाली सराटीतून दिली.
सात ऑगस्टपासून पश्चिम महाराष्ट्रातील रॅलीची सुरुवात होणार असून त्याच दिवशी सोलापुरामध्ये भव्य स्वरूपात मराठ्यांचे वादळ धडकेल अशी प्रतिक्रिया देण्यात आली आहे. आज गुरुवारी अंतरवाली सराटीमध्ये सोलापूर, सांगली, कोल्हापूर सातारा, अहमदनगर ,पुणे, नाशिक जिल्ह्यांमध्ये मराठा जागृती शांतता रॅली काढण्याबाबत नियोजन करण्यात आले.
आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण राज्याचे लक्ष जरांगे पाटलांच्या रॅलीकडे लागून राहिले आहे. पाटील यांच्या उपस्थितीत सात जिल्ह्याचे मराठा समन्वयक, आमरण उपोषणकर्ते, साखळी उपोषणकर्ते,मराठा सेवक यांची नियोजन बैठक आयोजित करण्यात आली होती. सोलापूरमध्ये 7 ऑगस्ट रोजी मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील येत असून या दौऱ्याची संपूर्ण तयारी नियोजनबद्ध पद्धतीने करण्यात येईल. सर्व अकरा तालुक्यांच्या समाज बांधवांना याची माहिती देण्यात येणार आहे.
या शांतता रॅलीत सर्व जाती-धर्माचे समाज बांधव एकत्रित येणार असून सामाजिक सलोखा राखण्याचे काम मराठा समाज करेल. छत्रपती शिवाजी महाराज चौकात भव्य सभेचे नियोजन करण्यात येणार आहे.
माऊली पवार, समन्वयक
सकल मराठा समाज