सोलापूर : महाराष्ट्र शासन, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत शासन निर्णय दिनांक. १७ जुन २०१४ अन्वये दिव्यांग अव्यंग व्यक्तीच्या विवाहास प्रोत्साहन देण्यासाठी आर्थिक सहाय्याची योजना राबविण्यात येते. दिव्यांग अव्यंग व्यक्तीच्या विवाह झालेल्या दांपत्याना ५० हजार रुपये इतके अनुदान देण्यात येते, अशी माहिती जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण अधिकारी सुलोचना सोनवणे यांनी दिली.
लग्नही प्रत्येकाच्या आयुष्यातील टर्निंग पॉईंट असते. लग्न साधेपणाने करा किंवा थाटामाटाने प्रत्येकाला आर्थिक झळ सोसावीच लागते. लग्नाला लागणाऱ्या खर्चासाठी बऱ्याच जणांना कसरत करावी लागते. लग्न होण्याआधी किंवा लग्न झाल्यावर बऱ्याच जणांना आर्थिक अडचणींना तोंड द्यावे लागते. ही गरज ओळखून शासनाने दिव्यांग दांपत्यांना संसारांला मदत व्हावी या उद्देशाने अनुदान देण्याची योजना सुरू केली आहे. दिव्यांग किंवा अव्यांग व्यक्तींना अनुदान मिळवण्याच्या योजनेचे अटी व शर्ती खालील प्रमाणे आहेत. वधू व वराकडे दिव्यांग व्यक्ती अधिनियमाप्रमाणे किमान ४० % अथवा त्यापेक्षा जास्त दिव्यांगत्वाचे सक्षम प्राधिकाऱ्यांने दिलेले प्रमाणपत्र असावे. दिव्यांग वधू किंवा वर यापैकी एक महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा. विवाहित वधू व वरांचा प्रथम विवाह असावा. वधू अथवा वर घटस्फोटीत असल्यास अशा प्रकारची मदत यापुर्वी घेतलेली नसावी.
विवाह हा कायदेशिर रित्या विवाह नोंदणी कार्यालयाकडे नोंदविलेला असावा.सदर योजनेचा लाभ घेण्यासाठी एक दिव्यांग व्यक्ती व सदृढ व्यक्तीने विवाह करणे गरजेचे आहे. विवाह झाल्यानंतर किमान एक वर्षाच्या आत त्यांनी या योजनेचा लाभ घेण्यासाठी जिल्हा समाज कल्याण अधिकारी, जिल्हा परिषद, सोलापूर या कार्यालयाकडे अर्ज सादर करावा.तसेच याव्दारे जिल्हयातील सर्व नागरीकांना आवाहन करण्यात येते की, सदर योजनेचा लाभ घेण्यासाठी तात्काळ जिल्हा समाज कल्याण अधिकारी, जिल्हा परिषद, सोलापूर यांचेकडे अर्ज सादर करावा असे आवाहन समाजकल्याण अधिकारी सोनवणे यांनी केले आहे.

More Stories
सोलापूर झेडपीत नवा पायंडा; तदर्थ पदोन्नतीद्वारे मर्जीतील कर्मचाऱ्यांना स्थान
मंद्रूप पोलीस ठाण्यात तहानलेल्या पक्षांसाठी सुरू केली पाणपोई
अंगणवाडी कर्मचाऱ्यांना मिळाले सीईओंच्याहस्ते पुरस्कार