सोलापूर : पंढरपूर येथे आषाढी वारीनिमित्त चार दिवस घेण्यात आलेल्या महाआरोग्य शिबिरात जिल्हा परिषदेचे अध्यक्ष दीपक वैद्य व आरोग्य सभापती चेतनसिंह केदार यांचा अधिकार डावलल्याची गंभीर बाब समोर आली आहे. जिल्हा परिषदेत पदाधिकारी येऊन चार महिने झाले पण प्रशासन अजून प्रशासकीय भूमिकेतून बाहेर पडल्याचे दिसत नाही. कर्मचाऱ्यांच्या भानगडीवर तर प्रशासनाने अद्याप काहीच निर्णय घेतला नसल्याचे दिसून येत आहे. जिल्हा परिषदेची आज स्थायी समितीची सभा होणार असून पदाधिकारी आपला अधिकार गाजवणार का? असा सवाल उपस्थित केला जात आहे.
यंदाच्या आषाढी वारी नियोजनात मोठ्या प्रमाणावर मनमानी झाल्याचे दिसून आले आहे. कोण कोणत्या नियोजनात व्यस्त होते हे पदाधिकाऱ्यांना सांगण्यात आले नाही. आषाढी एकादशीच्या नियोजनमध्ये जिल्हा परिषदेचा आरोग्य विभाग पहिल्यांदाच या वेळेस बाजूला राहिला आहे. महाआरोग्य शिबिराची सर्व सूत्रे सार्वजनिक आरोग्य विभागाकडे म्हणजेच जिल्हा शल्य चिकित्सक यांच्या अधिपत्याखाली देण्यात आली होती. त्यामुळे या शिबिराबाबत जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. वर्षा डोईफोडे यांनी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष दीपक वैद्य व आरोग्य सभापती चेतनसिंह केदार यांना विश्वासात न घेताच सर्व सुविधा राबविल्या. महाआरोग्य शिबिराच्या उद्घाटनाला जिल्हा परिषदेचे अध्यक्ष दीपक वैद्य, आरोग्य सभापती चेतनसिंह केदार आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन यांनाही बोलावले नाही. इतकेच काय चार दिवसाच्या या शिबिराला जिल्हा परिषदेचे पदाधिकारी किंवा अधिकाऱ्यांनी भेट दिलेली नाही. सार्वजनिक आरोग्य विभागाने जिल्हा परिषदेचे पदाधिकारी व अधिकाऱ्यांना या शिबिरासाठी निमंत्रित करणे आवश्यक होते. पण तसे घडले नाही.
जिल्हा परिषदेचे कर्मचारी वेदखल…
महाआरोग्य शिबिरासाठी जिल्हा परिषद आरोग्य कर्मचाऱ्यांना घेण्यात आलेच नाही. त्यामुळे माजी आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांच्या कार्य काळात गेल्या दोन वर्षात झालेल्या महाआरोग्य शिबिरापेक्षा या शिबिराची चर्चा झाली नाही. शिबिरासाठी यंत्रनाही कूचकामी ठरली. त्यामुळे प्रत्यक्षात वारकऱ्यांना या शिबिराचा कितपत उपयोग झाला हे आरोग्य विभागालाच ठाऊक. जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाच्या इतिहासात आषाढी वारीमध्ये पहिल्यांदा जिल्हा आरोग्य अधिकाऱ्याला दुय्यम स्थान देण्यात आले. जिल्हा आरोग्य अधिकारी हे जबाबदारीचे व मानाचे पद असताना डॉ. सतीश कोपूर वाड यांना ही जबाबदारी पेलता आली नाही अशी चर्चा कर्मचाऱ्यात रंगली आहे. केवळ समन्वय म्हणून त्यांना बाजूला ठेवण्यात आले. आषाढी वारीची जबाबदारी नसल्यामुळे आरोग्य विभागाचे अनेक कर्मचारी मुंबई व पुणे वारीत गुंतल्याचे दिसून आले.
पदाधिकाऱ्यांचा अवमान…
सार्वजनिक आरोग्य विभागाने जिल्हा परिषदेच्या पदाधिकाऱ्यांना विश्वासात न घेताच महाआरोग्य शिबिर आटोपले. यामध्ये पदाधिकाऱ्यांचा पहिल्यांदाच असा अवमान झाला आहे. महाआरोग्य शिबिरासाठी जिल्हा परिषदेने खर्च केला. सार्वजनिक आरोग्य विभागाच्या फायली मंजुरीसाठी सीईओकडे आल्या. कोणताही विलंब न लावता जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष दीपक वैद्य यांनी या फाईल मंजूर केल्या. पण जबाबदार अधिकाऱ्यांनी जिल्हा परिषदेलाच विश्वासात घेतले नाही, असे आता सांगितले जात आहे.
आमचा रोल नव्हता…
आषाढी वारीमध्ये चार दिवस सार्वजनिक आरोग्य विभागाने महा आरोग्य शिबिर भरविले होते. त्यामध्ये जिल्हा परिषदेचा कोणताही रोल नव्हता असे स्पष्टीकरण सीईओ कुशल जैन यांनी दिले आहे.
पालकमंत्र्यांच्या आदेशाला कोलदांडा
जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागात काम करणारे विस्तार अधिकारी मनोज मेत्रे यांना सुडात्मक दृष्टिकोन ठेवून निलंबित करण्यात आले. माध्यमांनी याप्रकरणी आवाज उठवल्यानंतर पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी यात लक्ष घातले. त्यांनी सीईओ जैन यांच्याशी याबाबत बोलण्याचे सांगतण्यात आले. सीईओ जैन यांनी यावर लगेच निर्णय घेतो असे सांगितले पण महिना उलटून गेला मैत्री यांची फाईल निर्णयापर्यंत आलीच नाही. आरोग्य विभागातील फार्मशिस्ट पुजारी यांनी विभागीय आयुक्तांकडून नियुक्ती मिळवण्यासाठी जिल्हा औषध भंडारात काम केल्याचे खोटे प्रमाणपत्र जोडले. याबाबत तक्रारी झाल्यावर चौकशी करून कारवाई करण्यात येईल असे सांगण्यात आले पण अद्याप यावर काहीच कारवाई झालेली नाही. असे अनेक विषय प्रशासनाकडे प्रलंबित आहेत. जिल्हा परिषदेच्या पदाधिकाऱ्यांची यावर भूमिका काय हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. आजच्या स्थायी समितीत जिल्हा परिषदेचे अध्यक्ष दीपक वैद्य कोणती भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

More Stories
राज्यातील जलजीवन मिशनच्या कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी 14 कोटी 57 लक्ष निधी वितरीत
घरकुल योजनेचा प्रत्येक आठवड्याला घेणार सीईओ कुशल जैन प्रगतीचा आढावा
ग्रामीण भागातील गरोदर महिलांना मोफत सोनोग्राफी सुविधा