August 4, 2026

Solapur Samachar

Latest Marathi News

झेडपीच्या सभेला दांडी मारणाऱ्या डीएचओना नोटीस देण्याच्या आदेश

सोलापूर : जिल्हा परिषद सोलापूरच्या स्थायी समितीची बैठक अध्यक्ष तथा सभापती दीपक अरुण वैद्य यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा परिषदेच्या शिवरत्न सभागृहात झाली. जिल्ह्याच्या विकासकामांना गती देतानाच गुणवत्ता, पारदर्शकता आणि नागरिकांना प्रभावी सेवा मिळण्यावर बैठकीत भर देण्यात आला. शिवरत्न सभागृहाला अटल बिहारी वाजपेयी यांचे नाव देण्याचा ठराव मंजूर करीत परवानगी नाकारली असतानाही सभेला गैरहजर राहणाऱ्या डीएचओ डॉ. सतीश कोपूरवाड यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्याचे आदेश अध्यक्ष वैद्य यांनी दिले.

शिक्षण विभागाच्या आढाव्यात ११ तालुक्यांत ११ आदर्श शाळा उभारण्याचा निर्धार करण्यात आला. प्रत्येक तालुक्यात विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षणासोबत आधुनिक सुविधा, गुणवत्तापूर्ण शैक्षणिक वातावरण आणि आवश्यक पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी नियोजनबद्ध कार्यवाही करण्याच्या सूचना देण्यात आल्या. पृथ्वीराज माने यांनी जिल्हा परिषदेची नेहरूनगर येथे अंडी उबवणूक केंद्राची मोठी जागा आहे. या जागेत अतिक्रमण होऊ नये म्हणून जिल्हा औषध भांडार व इतर कामांसाठी वापर करावा असे सूचना केली. उंबरजे यांनी शाळेंमधील आहार गुणवत्तापूर्ण असावा व पटसंख्या वाढविण्यासाठी प्रयत्न व्हावेत अशी सूचना मांडली. दादा लवटे यांनी माझी मुले जिल्हा परिषदेच्या शाळेत आहेत. मुलांना चांगला गणवेश हवा. सध्या जे बचत गटांमार्फत गणवेश वाटप केले आहेत त्यांची गुणवत्ता चांगली नाही, याची चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली.

आरोग्य विभागाच्या चर्चेत सर्पदंश व रेबीज प्रतिबंधक उपाययोजना, तसेच आरोग्य संस्थांमध्ये औषधांचा सुरक्षित साठा करण्यासाठी आवश्यक जागेची उपलब्धता या विषयांवर चर्चा झाली. ग्रामीण भागातील नागरिकांना आपत्कालीन परिस्थितीत तातडीने उपचार मिळावेत, यासाठी आवश्यक नियोजन करण्यावर भर देण्यात आला. जिल्हा आरोग्य अधिकारी कोपूरवाड सभेला गैरहजर राहिले. पुण्याला बैठकीला जाण्यासाठी त्यांनी अध्यक्ष वैद्य यांच्याकडे परवानगी मागितली होती. पण स्थायी सभेचे गांभीर्य ओळखून व आरोग्य विभागाचे अनेक प्रलंबित विषय व तक्रारीबाबत चर्चा होणार असल्याने अध्यक्ष वैद्य यांनी कोपूरवाड यांना पुण्याला जाण्यासाठी परवानगी नाकारली होती. अध्यक्षाच्या आदेशाचा अवमान करीत ते पुण्याला बैठकीला निघून गेले. याबाबत अध्यक्ष वैद्य यांनी सभेत संताप व्यक्त करीत डीएचओना कारणे दाखवा नोटीस बजावण्याचे प्रशासनाला आदेश दिले.

जिल्हा परिषदेच्या ‘शिवरत्न सभागृहाला ‘“भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी सभागृह”’ असे नामकरण करण्याचा ठराव उपाध्यक्ष इंद्रजीत पवार यांनी सभागृहापुढे मांडला. एकमताने हा ठराव मंजूर करण्यात आला.

यावेळी जिल्हा परिषद अंतर्गत सुरू असलेल्या विविध विकासकामांचा आढावा घेण्यात आला. कामांची गुणवत्ता, निधीचा योग्य वापर आणि पारदर्शकता याबाबत संबंधित विभागांनी दक्षता घेण्याच्या सूचना देण्यात आल्या. योजनांचा लाभ शेवटच्या घटकापर्यंत पोहोचण्यासाठी विभागांमध्ये प्रभावी समन्वय ठेवण्याचे निर्देशही देण्यात आले.बैठकीच्या प्रारंभी माजी राज्यपाल पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील यांच्या निधनाबद्दल दोन मिनिटे मौन पाळून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. त्यानंतर २५ जून रोजी झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीचे कार्यवृत्त वाचून कायम करण्यात आले. शासनाकडून प्राप्त महत्त्वपूर्ण परिपत्रके व शासन निर्णयांचे वाचन करून नोंद घेण्यात आली.

बैठकीस उपाध्यक्ष तथा अर्थ व बांधकाम समिती सभापती इंद्रजीत पवार, शिक्षण व आरोग्य समिती सभापती चेतनसिंह केदार, कृषी, पशुसंवर्धन व दुग्धशाळा समिती सभापती रामप्पा चिवडशेट्टी, महिला व बालकल्याण समिती सभापती अमृता वाघे, समाजकल्याण समिती सभापती संस्कृती सातपुते, समिती सदस्य पृथ्वीराज माने, आदिनाथ देशमुख, रश्मी बागल, बालाजी नरुटे आणि रमेश भांजे, मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत) तथा सदस्य सचिव सूर्यकांत भुजबळ, मुख्य लेखा व वित्त अधिकारी मीनाक्षी वाकडे यांच्यासह सर्व विभागप्रमुख उपस्थित होते