June 29, 2026

Solapur Samachar

Latest Marathi News

अक्कलकोट: शाळेवर शिक्षणाधिकारी, विद्यार्थी हजर पण शिक्षकच गायब

सोलापूर : जिल्हा परिषदेत पदाधिकाऱ्यांनी शिक्षण विभागात लक्ष घातल्यापासून झेडपी शाळांचा दर्जा उंचावण्यासाठी प्रयत्न सुरू झाले आहेत. अधिकाऱ्यांनी सरप्राईज व्हिजिट सुरू केल्यामुळे शाळांमधील स्थिती आता समोर येत आहे. प्राथमिक शिक्षणाधिकारी कादर शेख यांनी शनिवारी अक्कलकोट तालुक्यातील शाळेला भेट दिल्यानंतर शिक्षणाधिकारी, विद्यार्थी हजर पण शिक्षकांचा पत्ता नसल्याचे चित्र दिसून आले आहे.

अक्कलकोट तालुक्यातील संगोळगी झेडपी शाळेत शिक्षण अधिकारी सकाळी पावणे आठ वाजता हजर झाले. शाळा सुरू होण्याची वेळ असल्याने बरेच विद्यार्थी हजर होते मात्र एकाही शिक्षकांचा पत्ता दिसून आला नाही. उपस्थित विद्यार्थ्यांसमवेत शिक्षणाधिकारी शेख यांचे छायाचित्र सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. शिक्षणाधिकाऱ्यांच्या भेटीतून अक्कलकोट तालुक्याचा शिक्षण विभागाच्या कारभार चव्हाट्यावर आला आहे.
वादग्रस्त गटशिक्षणाधिकारी प्रशांत आरबाळे यांचे तालुक्यातील शाळांकडे लक्ष नसल्याचे पुन्हा एकदा दिसून आले आहे.

राज्याच्या माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचनालयाचे संचालक महेश पालकर यांनी शनिवारी सोलापूर जिल्ह्याचा दौरा केला. पुण्याहून येताना त्यांनी पंढरपूर तालुक्यातील शाळा तपासल्या. त्यानंतर अक्कलकोट तालुक्यातील मैंदर्गी व परिसरातील जिल्हा परिषद व खाजगी माध्यमिक शाळांना भेट दिली. यावेळी त्यांच्या समवेत माध्यमिक शिक्षणाधिकारी सचिन जगताप व प्राथमिक शिक्षणाधिकारी कादर शेख उपस्थित होते. पालकर यांच्याकडे प्राथमिक शिक्षण विभागाचाही अतिरिक्त पदभार आहे. शिक्षण आयुक्तांनी शिक्षण अधिकाऱ्यांना दर आठवड्यात दोन दिवस तालुक्यात दौरे करून शाळांची तपासणी करण्याबाबत सूचित केले आहे. शिक्षण संचालक दौऱ्यावर येत असल्यामुळे प्राथमिक शिक्षणाधिकारी कादर शेख यांनी सकाळपासूनच शाळा तपासणीला सुरुवात केली. पण गटशिक्षणाधिकारी प्रशांत आरबळे हे मात्र सजग नसल्याचे दिसून आले. गटशिक्षण कार्यालयाला याची माहिती नसल्यामुळे अचानक भेट दिल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. झेडपी व खाजगी शाळांमधील रोज काय परिस्थिती असेल याचा या सरप्राईज व्हिजिटमधून शोध घेण्यात आल्याचे सांगण्यात आले. अक्कलकोट तालुक्यातील शाळांची पटसंख्या, गुणवत्ता याबाबत गंभीर चित्र समोर आल्याचे सांगितले जात आहे. खाजगी शाळांमध्ये जो पट दाखविला तितके विद्यार्थी हजर नव्हते. विद्यार्थ्यांना विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे समर्पकपणे देता आली नाहीत. यामुळे खाजगी शाळांमधील ही शिक्षणाचा दर्जा उघड झाला आहे.