August 18, 2026

Solapur Samachar

Latest Marathi News

झेडपी सभेत बसलेल्या फार्मासिस्टचा खुलासा घेणार

झेडपी सभेत बसलेल्या फार्मासिस्टचा खुलासा घेणार

सोलापूर : जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत झालेल्या गोंधळाबाबत जिल्हा परिषदेचे अध्यक्ष दीपक वैद्य यांनी नापसंती व्यक्त करत सभागृहात
बसलेल्या त्या दोन फार्मशिष्ट कडून खुलासे घेणार असल्याची माहिती दिली.

जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा दीपक वैद्य यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच झाली. सभेच्या आधीच अध्यक्ष वैद्य यांनी आयत्या वेळच्या विषयाबाबत सर्वच विभाग प्रमुख व सदस्यांना सुचित केले होते. सभेचे सर्व अधिकार अध्यक्षांकडे आहेत. सभेत बोलण्यासाठी व बसण्यासाठी अध्यक्षांची परवानगी लागते. सभेच्या कामकाजात जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष सभापती व संबंधित विभाग प्रमुखांनाच बसता येते. कामकाजाच्या अनुषंगाने विचारलेल्या प्रश्नांना अध्यक्षांच्या परवानगीनेच विभाग प्रमुखांना उत्तरे द्यावी लागतात. ज्यावेळी असे उत्तर देण्याबाबत अध्यक्ष सूचित करतात त्याबाबत विभाग प्रमुखांना सदस्याने विचारलेली माहिती नसेल तर संबंधित कर्मचाऱ्यांकडून माहिती घेण्यासाठी कर्मचाऱ्यांना सभागृहाजवळ बोलाविले जाते पण सभागृहात त्यांना बसण्याची अनुमती दिली जात नाही. असे असताना नुकत्याच झालेल्या सभेत आरोग्य विभागाच्या औषध निर्माण अधिकारी लीना पुजारी व पाटील या दोघी सभागृहात बसल्या होत्या. आदिनाथ देशमुख यांनी लसीबाबत प्रश्न उपस्थित केल्यानंतर उत्तर देण्यासाठी विभाग प्रमुख आरोग्य अधिकारी सतीश कोपुरवाड उठले. पण अध्यक्ष व विभाग प्रमुख कोपरवाड यांच्या संमतीविनाच औषध निर्माण अधिकारी पुजारी उठल्या व त्यांनी देशमुख यांच्या प्रश्नाला उत्तर देण्यास सुरुवात केली. याबाबत देशमुख यांनी जाब विचारल्यानंतर त्यांनी प्रतिवाद केला. या सवाल जबाबचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर अनेकांनी कर्मचाऱ्यांनी सभागृहात उपस्थित राहून सदस्यांच्या प्रश्नाला उत्तर कसे दिले याबद्दल आश्चर्य व्यक्त केले. याबद्दल विचारणा केल्यानंतर औषध निर्माण अधिकारी पुजारी यांनी आपल्याला विभाग प्रमुखांनी बोलावले होते असे सांगितले. जिल्हा परिषदेचे अध्यक्ष व सीईओ यांनाही सभागृहाचे कामकाज सुरू असताना ही बाब निदर्शनाला आली नाही. सभेचे सचिव हेही प्रभारी होते.

*अध्यक्ष झाले गंभीर…*
सभेत झालेल्या गोंधळाबाबत अध्यक्ष दीपक वैद्य हे गंभीर झाले आहेत. त्यांनी ही बाब गांभीर्याने घेतली आहे. सभेत कर्मचाऱ्यांना बसण्यास परवानगी नसते हे मला माहीत नव्हते. सचिवांकडून माहिती घेऊन संबंधित कर्मचाऱ्यांकडून याबाबत खुलासा मागितला जाईल असे त्यांनी स्पष्ट केले.

*रीलस्टार बंद करणार…*
सभागृहात अनेक रीलस्टारही उपस्थित राहत आहेत. सभेचे कामकाज सुरू असताना सभागृहात फिरून हे चित्रीकरण करताना दिसून येत आहेत. त्यामुळे पुढील सभेत अशा रील स्टार ला पण बंदी घातले जाईल असे अध्यक्ष वैद्य यांनी सांगितले. यापुढे सभेच्या नियमाचे काटेकोरपणे पालन केले जाईल असेही त्यांनी स्पष्ट केले.

अनेकांनी तपासले नियमावली…

जिल्हा परिषदेच्या सभेच्या कामकाजाला कर्मचाऱ्यांची उपस्थिती व सदस्यांनी विचारलेला प्रश्नाला दिले उत्तर याबाबतचा व्हिडिओ सोलापूर समाचार ने व्हायरल केल्यानंतर जिल्हा परिषद व पंचायत राज ची सभेबाबत काही नियमावली आहे याबाबत अनेकांनी गुगलकडून माहिती घेतली. राज्यातील इतर जिल्हा परिषदेच्या सभेच्या कामकाजाची नियमावली अनेकांनी तपासून शेअर केली. यामध्ये कर्मचाऱ्यांना सभागृहात बसता येत नसल्याने सभागृहाचे अध्यक्ष त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करू शकतात असे स्पष्टीकरण अनेकांनी केले आहे. सोलापूर जिल्हा परिषदेच्या सभेमध्ये पदाधिकारी नवीन असून अध्यक्षांचे परवानगी न घेताच सदस्य, सभापती, अधिकारी, कर्मचारी बोलत असल्याचे दिसून आले आहे. यापुढील सभेत मी उत्तर द्या असे म्हटल्याशिवाय कोणालाही बोलू दिले जाणार नाही, असे स्पष्टीकरण अध्यक्ष वैद्य यांनी दिले आहे.