सोलापूर : अनिष्ट व अघोरी प्रथा तसेच जादूटोण्याच्या माध्यमातून पीडितांची फसवणूक करून मिळालेल्या पैशांची विल्हेवाट लावल्याप्रकरणी कुर्डुवाडी पोलिसांनी तपासाची व्याप्ती वाढवत आणखी दोघांना अटक केली आहे. राजेंद्र गोकुळ हुंबे आणि लक्ष्मीकांत मनमथ लिगाडे अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. या प्रकरणातील मुख्य आरोपी मनोहर ऊर्फ ‘मामा’ चंद्रकांत भोसले याच्यासह सोलापूर ग्रामीण जिल्ह्यात एकूण सहा गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
कुर्डुवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक १९२/२०२६ अन्वये २३ एप्रिल २०२६ रोजी महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष, अनिष्ट व अघोरी प्रथा व जादूटोणा प्रतिबंधक अधिनियमातील कलम ३(२), ३(३) तसेच भारतीय न्याय संहितेतील कलम ३१८(२), ३१८(४), ३(५) आणि १११(२)(ब) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या गुन्ह्याच्या गांभीर्याची दखल घेत सोलापूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी तपासासाठी पोलीस अधिकारी व अंमलदारांचे विशेष एसआयटी पथक स्थापन केले आहे. तपासादरम्यान मनोहर भोसले याच्याकडून मिळालेल्या अवैध पैशांची विल्हेवाट दत्तकला इन्स्टिट्यूट, स्वामी चिंचोली, दौंड, पुणे येथील संस्थापक-अध्यक्ष रामदास झोळ यांच्या माध्यमातून लावल्याचे तपासात निष्पन्न झाल्याचे पोलिसांनी सांगितले.
संस्थेमध्ये आरोपींना मदत केल्याच्या आरोपावरून राजेंद्र हुंबे व लक्ष्मीकांत लिगाडे यांना अटक करण्यात आली असून, दोघांना १७ ऑगस्ट २०२६पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. रामदास झोळ यांचा शोध सुरू आहे. दरम्यान, दत्तकला इन्स्टिट्यूटमधील महत्त्वाच्या नोंदी असलेले रजिस्टर, संगणक व इतर साहित्य पोलिसांनी जप्त केले आहे.या गुन्ह्याचा तपास सोलापूर ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक राहुल गरड करीत आहेत. गुन्ह्यातील इतर पाहिजे आरोपींचा शोध सुरू असून, तपासात आणखी महत्त्वाची माहिती समोर येण्याची शक्यता आहे.

More Stories
आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी मरवडे आरोग्य केंद्रातील लोकांशी साधला संवाद
पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्याहस्ते राष्ट्रपती पदक विजेते एसीपी मनोजकुमार यादव यांच्यासह मान्यवरांचा सन्मान
सोलापूरकरांना दिलेला प्रत्येक शब्द पूर्ण करणार: पालकमंत्री जयकुमार गोरे