August 20, 2026

Solapur Samachar

Latest Marathi News

सोलापूर माध्यमिकचा अनुकंपा नियुक्तीचा ऑनलाईन धडाका

सोलापूर : जिल्हा परिषद माध्यमिक शिक्षण विभागाने ऑनलाइन प्रस्ताव आलेल्या अनुकंपा नियुक्तीचा धडाका सुरूच ठेवला आहे. माध्यमिक शिक्षणाधिकारी सचिन जगताप यांनी सोलापुरातील शिक्षकाच्या मृत्यूनंतर आर्थिक अडचणीत आलेल्या तरुणाला ऑनलाईन नियुक्ती देऊन आधार दिला. माजी शिक्षक आमदाराच्या उपस्थितीत घडलेल्या या प्रसंगाने तो तरुण भावूक झाला.

माजी शिक्षक आमदार दत्तात्रय सावंत हे बुधवारी शिक्षकांचे प्रश्न घेऊन माध्यमिक शिक्षण विभागात आले होते. शिक्षकांच्या वैयक्तिक मान्यता, पदोन्नती, अनुकंपा नियुक्ती, पोर्टल भरती आदी विषयावर चर्चा झाली. अनुकंपा नियुक्तीचा विषय चर्चेला आल्यानंतर शिक्षणाधिकारी जगताप यांनी ऑनलाईन आलेल्या प्रस्तावाला तात्काळ मंजुरी दिली. त्या शिक्षकाला माजी आमदार सावंत यांच्याचहस्ते नियुक्तीपत्र दिले. त्यामुळे त्या शिक्षकाच्या डोळ्यात अश्रू तरळले.

शुभम दयानंद लोंढे यांना प्रयोगशाळा परिचर म्हणून अनुकंपा तत्वावर माध्यमिक शिक्षणाधिकारी सचिन जगताप यांनी पुढील तीन वर्षासाठी ऑनलाइन नियुक्ती मंजूर केली. शुभम यांचे वडील दयानंद हे सोलापुरातील मजरेवाडी येथील मानवता विकास संचलित पंचशील माध्यमिक प्रशालेमध्ये प्रयोगशाळा परिचर म्हणून कामास होते. 25 सप्टेंबर 2025 रोजी त्यांचे निधन झाले. त्यांच्या आईला कॅन्सरची बाधा झाली आहे. त्यामुळे दयानंद यांच्या निधनानंतर मिळालेल्या आर्थिक लाभाची रक्कम आईच्या उपचारावर खर्च झाली. रुग्णालयाचा खर्च व अशात घरात कोणीच काम करत नसल्यामुळे शुभम यांची आर्थिक कोंडी झाली. जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागात असलेले मामा लोखंडे यांनी त्यांना आधार दिला. वडिलांच्या जागी नोकरी मिळावी म्हणून त्यांनी माध्यमिक शिक्षण विभागाकडे तीन नोव्हेंबर 2025 रोजी अर्ज केला. लिपिक अनिल पाटील यांनी कागदपत्रांची पूर्तता  तपासून प्रकरण मंजुरीसाठी माध्यमिक शिक्षणाधिकारी सचिन जगताप यांच्याकडे पाठविले. शिक्षणाधिकारी जगताप यांनी त्यांच्या प्रस्तावाला ऑनलाइन मंजुरी दिली. माजी शिक्षक आमदार सावंत यांच्याहस्ते शुभम लोंढे यांना प्रयोगशाळा परिचर म्हणून मान्यतेचे पत्र देण्यात आले. वडिलांच्या जागी आपल्याला नोकरी मिळाली म्हणून शुभम हे भावूक झाले. माजी आमदार सावंत व शिक्षणाधिकारी जगताप यांनी त्यांना पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या. यावेळी शिक्षक संघटनेचे वांगीकर आदी उपस्थित होते. माध्यमिक शिक्षण विभागाने अनुकंपाचे आलेले विषय तातडीने मार्गी लावण्याचा धडाका सुरूच ठेवला आहे. त्याबद्दल शिक्षक वर्गातून समाधान व्यक्त होत आहे.