September 3, 2026

Solapur Samachar

Latest Marathi News

भ्रमणध्वनी बंद करून अडाकूल गायब; झेडपी आरोग्य विभागाची वाढली परेशानी

सोलापूर : बदली झाल्यानंतर जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातील लिपिक एस. अडाकूल हे आपला भ्रमणध्वनी बंद करून गायब झाल्याने आरोग्य विभागाची डोकेदुखी झाली आहे.

एकाच ठिकाणी पाच वर्षे कार्यकाल पूर्ण करणाऱ्या जिल्हा परिषदेतील कर्मचाऱ्यांच्या बदल्या झाल्या. त्यात जिल्हा परिषदेतील आरोग्य विभागातील लिपिक अडकुल यांची शिक्षण विभागात बदली झाली. बदली होऊन महिना उलटला तरी त्यांनी पदभार सोडला नाही. पण गेल्या काही दिवसापासून ते आपल्या टेबलावर उपस्थित राहत नसल्यामुळे व दप्तर कपाटात बंद करून गायब झाल्याने जिल्हा परिषदेतील प्राथमिक आरोग्य केंद्रात काम करणाऱ्या वैद्यकीय अधिकाऱ्यांचा पगार रखडला आहे. सप्टेंबर मध्ये पगार न झाल्यामुळे वैतागलेले डॉक्टर बुधवारी सायंकाळी जिल्हा परिषदेत आरोग्य अधिकारी डॉ. सतीश कोपूरवाड यांच्याकडे आले. चौकशी केल्यानंतर अडाकूल यांनी बदली झाल्यानंतर दुसऱ्या कर्मचाऱ्यांकडे पदभार सोपवला नसल्याचे दिसून आले. त्यांचा भ्रमणध्वनीही बंद लागत होता. त्यामुळे डॉक्टरांचा पगार कसा करावा याबाबत जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कोपूरवाड यांनी प्रशासन विभागाशी सल्लामसलत केली. दप्तर कपाटात अडकले व संगणकाचे पासवर्ड हॅन्डवर्क न केल्यामुळे दुसऱ्या कर्मचाऱ्यांकडूनही हे काम करून घेणे अशक्य असल्याचे दिसून आले. त्यामुळे अडाकुल यांचा शोध सुरू असून अन्यथा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या परवानगीने पंचनामा करून दप्तर ताब्यात घेतले जाणार आहे.