
सोलापूर : राष्ट्रीय ग्रामस्वराज अभियानांतर्गत आराखडे वेळेत ऑनलाईन करा, असे आवाहन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनिषा आव्हाळे यांनी केले. करसंकलनासाठी जिल्हा परिषदेने क्यूआरकोड प्रणाली अंमलात आणली असून तिचा वापर प्रभावीपणे करा ,असे आवाहन त्यांनी केले.
जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात राष्ट्रीय ग्रामस्वराज अभियानअंतर्गत बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीला जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनिषा आव्हाळे मार्गदर्शन केले. याप्रसंगी पंचायत राजच्या राज्य व्यवस्थापन कक्ष संचालक आनंद भंडारी, उपसंचालक श्याम पटवारी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी इशाधिन शेळकंदे, अमोल जाधव, एचडीएफसी बॅंकेचे माधव मगे, अजिंक्य पुरवत, दया शंख, गायकवाड अमर ढाले, जिल्ह्यातील सर्व गट विकास अधिकारी, सर्व विस्तार अधिकारी उपस्थित होते. जिल्हातील ग्रामपंचायतीचा कारभार डिजिटल होणार असून सर्व ग्रामपंचायतींचे एकाच बॅंकेत खाते काढण्यात येत असून करसंकलनासाठी ग्रामपंचायतींना क्युआर कोड देण्यात आला आहे. सर्व गटविकास अधिकारी यांना
क्युआर कोडचे वितरण सीईओ आव्हाळे यांच्याहस्ते करण्यात आले.
या बैठकीमध्ये सर्वांची योजना सर्वांचा विकास या मोहिमेचा आढावा घेण्यात आला. सन 2023-24 चे व सन 2022-23 चे प्रलंबित पंचायत, जिल्हा परिषद व पंचायत समिती विकास आराखडे ई-ग्राम स्वराज्य पोर्टलवर अपलोड करण्यासाठी तालुका व्यवस्थापक व गट विकास अधिकारी यांचा सखोल आढावा संचालक आनंद भंडारी यांनी घेऊन मार्गदर्शन केले. राष्ट्रीय ग्रामस्वराज अभियानअंतर्गत माहे सप्टेंबर 2023 अखेर जिल्हास्तरावर, तालुकास्तरावील व गणस्तरावरील प्रशिक्षण माहे नोव्हेबर 23 पूर्वी पूर करण्यात यावे, अशा सूचना सीईओ मनिषा आव्हाळे यांनी दिल्या. पूर्ण केलेल्या प्रशिक्षणाची माहिती पोर्टलवर भरुन प्रशिक्षणार्थींना प्रशिक्षणाच्या शेवटच्या सत्रामध्ये प्रमाणपत्र वाटप करकरण्याबाबत संचालक श्याम पटवारी यांनी सांगितले. आभासी प्रशिक्षण वर्ग प्राथमिक स्वरुपात प्रत्येक तालुक्यात एक सुरु करणेबाबत आवश्यक बाबी व आवश्यक साहित्याची माहिती देण्यात आली. 15 वा वित्त आयोगाच्या प्राप्त निधीचा आढावा तालुकानिहाय घेण्यात आला. राष्ट्रीय ग्रामस्वराज अभियानअंतर्गत सन 2022-23 या वर्षाचे लेखापरिक्षण करुन घेणे व अहवाल सादर करण्याबाबत सांगितले आहे.
लोकांना वेळेत दाखले द्या
राष्ट्रीय ग्राम स्वराज अभियानअंतर्गत प्रशिक्षण वेळेत पूर्ण करा. आपले सरकार अंतर्गत सर्व ग्रामपंचायतीनी सर्व प्रकारचे दाखले वेळेत द्यावेत. लोकांना चांगली सेवा द्या. आपले सरकार अंतर्गत इतर सुविधाही देण्यात याव्यात, अशा सक्त सूचना सीईओ आव्हाळे यांनी दिल्या. करसंकलनासाठी ग्रामपंचायतींना क्युआर कोड देण्यात आला आहे. ग्रामनिधी या नावाने खाते काढण्यात येत असून आतापर्यंत जिल्ह्यातील ५५० ग्रामपंचायतींनी खाती काढली आहेत, अशी माहिती उपमुख्य कार्यकारी अधिकारी इशाधिन शेळकंदे यांनी दिली.