February 11, 2026

Solapur Samachar

Latest Marathi News

सोलापुरात ईश्वर गारमेंट कारखानदारावर गुन्हा दाखल

सोलापूर : सोलापुरातील अक्कलकोटरोड एमआयडीसी भागातील ईश्वर गारमेंट फॅक्टरीच्या आवारात अमेरिकन पिटबुल या हिंस्र प्रजातीच्या कुत्र्याने तरुणावर जीवघेणा हल्ला केल्याने मालकावर एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती पोलीस निरीक्षक राजन माने यांनी दिली.

कुत्र्याच्या हल्ल्यात असिफ मुल्ला हा तरुण गंभीर जखमी झाला आहे. 13 ऑक्टोबर रोजी सकाळी सात वाजता ही घटना घडली. पाटील पेट्रोल पंपासमोरील ईश्वर गारमेंटच्या आवारात असिफ या तरुणाने प्रवेश केल्यानंतर पिटबुल प्रजातीच्या कुत्र्याने त्याच्यावर जीवघेणा हल्ला केला. गंभीर जखमी अवस्थेत त्याला उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी त्याचा भावाने दिलेल्या फिर्यादीवरून ईश्वर गारमेंटचे मालक यांच्याविरुद्ध एमआयडीसी पोलीस ठाण्यात भादंवि 289 व 338 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आल्याचे पोलीस निरीक्षकांनी सांगितले.  सोलापूर शहर हद्दीत घर व व्यापार परिसराच्या संरक्षणासाठी किंवा छंद म्हणून कुत्रा पाळायचा असेल तर यासाठी महानगरपालिकेची परवानगी घ्यावी लागते. ईश्वर गारमेंटच्या मालकाने पिटबुल या अत्यंत हिंस्र प्रजातीचे पिल्लू पाळले आहे. याबाबत त्यांनी महानगरपालिकेकडून परवानगी घेतली आहे की नाही हे तपासले जाईल असे पोलिसांनी सांगितले.