चंद्रग्रहणात कोजागिरी पौर्णिमा कशी साजरी कराल?
पंचांगमध्ये काय सांगितले आहे वाचा..

- सोलापूर : कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी म्हणजेच शनिवार दि.२८ आॅक्टोंबर रोजी मध्यरात्री खंडग्रास चंद्रग्रहण आहे. या काळात तुळजापुरला देवीच्या दर्शनासाठी पायी चालत जाणाऱ्या भाविकांनी काय नियम पाळावेत. याबाबत पंचांगात काय माहिती दिली आहे, हे आम्ही वाचकांसाठी उपलब्ध करून देत आहोत.
ग्रहण स्पर्श-
२९ आॅक्टोंबर २०२३ रोजी रात्री ०१-०५ मि.
ग्रहण मध्य –
रात्री ०१-४४ मि.
ग्रहण मोक्ष –
रात्री ०२-२३ मि.
ग्रहण पर्वकाल –
१ तास १८ मि.चा आहे.
हे ग्रहण भारतासह सर्वत्र खंडग्रास दिसणार आहे.
ग्रहण दिसणारे प्रदेश – भारतासह संपूर्ण आशिया, ऑस्ट्रेलिया, रशिया, संपूर्ण युरोप, संपूर्ण अफ्रिका खंड या प्रदेशात ग्रहण दिसेल.
पुण्यकाल –
ग्रहण स्पर्शापासून ग्रहण मोक्षापर्यंत पुण्यकाल आहे.
ग्रहणाचा वेध –
हे ग्रहण रात्रीच्या तिसऱ्या प्रहरात असल्याने ३ प्रहर आधी म्हणजे शनिवारी २८ ऑक्टोबर रोजी दुपारी ०३-१४ मि. पासून ग्रहणाचे वेध पाळावेत. बाल, वृद्ध, अशक्त, आजारी व्यक्ती आणि गर्भवतींनी शनिवारी सायंकाळी ०७-४१ मि.पासून वेध पाळावेत. वेधामध्ये भोजन करू नये. स्नान, जप, देवपूजा, श्राद्ध इ. करता येतील, तसेच पाणी पिणे,झोपणे, मलमूत्रोत्सर्ग करता येईल.
ग्रहण पर्वकाळात म्हणजे दि.२९ ऑक्टोबर रोजी ०१-०५ मि. ते ०२-२३ मि. या काळात पाणी पिणे, झोपणे, मलमूत्रोत्सर्ग ही कर्मे करू नयेत.
ग्रहणातील कृत्ये-
ग्रहणस्पर्श होताच स्नान करावे.पर्वकालामध्ये देवपूजा, तर्पण, श्राद्ध , जप, होम, दान करावे.पूर्वी घेतलेल्या मंत्राचे पुरश्चरण चंद्रग्रहणात करावे, ग्रहण मोक्षानंतर स्नान करावे. ग्रहणकालामध्ये (पर्वकालामध्ये) झोप, मलमूत्रोत्सर्ग, अभ्यंग, भोजन, व कामविषयसेवन ही कर्मे करू नयेत. अशौच असता ग्रहणकालात ग्रहणासंबंधी स्नान, दान करण्यापुरती शुद्धी असते.
ग्रहणाचे राशिपरत्वे फल-
मिथुन, कर्क, वृश्चिक, कुंभ या राशीना शुभफल.
सिंह, तुला, धनु, मीन या राशीना मिश्रफल.
मेष, वृषभ, कन्या आणि मकर या राशीना अनिष्ट फल आहे.
ज्या राशींना अनिष्ट आहे त्या राशीच्या व्यक्तीनी आणि गर्भवतींनी हे ग्रहण पाहू नये.
यावर्षी २८ ऑक्टोबर २०२३ रोजी शनिवारी कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशीच चंद्रग्रहण आल्यामुळे रात्री ०१-०५ मि. ते ०२-२३ मि.असा ग्रहणाचा पर्वकाल आहे . त्यापूर्वी प्रतीवर्षीप्रमाणे रात्रीचे वेळी लक्ष्मी व इंद्राचे पूजन करून दूध साखरेचा नैवेद्य दाखवता येईल . मात्र प्रसाद म्हणून केवळ एक पळीभर किंवा चमचाभर दूध प्राशन करावे. राहिलेले दूध दुसरे दिवशी घेता येईल.
संदर्भ-दाते पंचांग