दिलीप स्वामी यांना जावे लागले भाड्याच्या घरात
सीईओ मनीषा आव्हाळे यांनी घेतला शासकीय निवासस्थानाचा ताबा

सोलापूर : जिल्हा परिषदेचे तत्कालीन सीईओ दिलीप स्वामी यांना पोस्टिंग न मिळाल्याने त्यांचा सोलापुरातील मुक्काम वाढला आहे. दरम्यान मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे यांनी आता शासकीय निवासस्थान ताब्यात घेतल्यामुळे स्वामी यांना भाड्याच्या घरात राहण्यासाठी जावे लागले आहे.
जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून मनीषा आव्हाळे यांची 20 जुलै रोजी नियुक्ती झाली. याचवेळी तत्कालीन सीईओ दिलीप स्वामी यांची बदली झाली पण त्यांना पोस्टिंग मिळाली नाही. गेल्या तीन महिन्यापासून ते सोलापुरात आपल्या शासकीय निवासस्थानीच तळ ठोकून होते. पोस्टिंग मिळवण्यासाठी त्यांनी मुंबईला हेलपाटे मारले.
दरम्यान देशातील सहा राज्याच्या निवडणुका जाहीर झाल्या. या निवडणुकांसाठी निरीक्षक म्हणून जाण्यासाठी त्यांना दिल्लीतील प्रशिक्षणासाठी पाठविण्यात आले. प्रशिक्षण संपवून ते सोलापुरात परतले आहेत. कामकाजास अडचण येऊ लागल्याने सीईओ आव्हाळे यांनी स्वामी यांच्याकडे निवासस्थानाचा ताबा मागितला. पण पोस्टिंग मिळेल म्हणून स्वामी वेटिंगमध्ये राहिले. या आठवड्यात दोन वेळा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या पण त्यात त्यांचा नंबर लागला नाही. सीईओ आव्हाळे यांनी गुरुवारी यशवंतनगर येथील पदाधिकाऱ्यांच्या निवासस्थानाची पाहणी केली. त्यानंतर कार्यकारी अभियंता खराडे यांना आपल्या निवासस्थानाचा ताबा घेण्याची प्रक्रिया पूर्ण करण्याची सूचना केली. त्याप्रमाणे कार्यकारी अभियंता खराडे यांनी स्वामी यांना निरोप पोहोचवला. त्यानुसार स्वामी यांनी आपले बिर्हाड अंत्रोळीकरनगरातील एका भाड्याच्या फ्लॅटमध्ये हलविल्याचे प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले. निवासस्थानाची रंगरंगोटी व दुरुस्ती झाल्यावर सीईओ आव्हाळे या तेथे राहण्यासाठी जाणार आहेत.
अशी पहिलीच वेळ…
जिल्हा परिषदेच्या सीईओला भाड्याच्या घरात राहण्यासाठी जाण्याची अशी पहिलीच वेळ आली आहे. यापूर्वीचे सीईओ बदलीनंतर बढतीवर गेले आहेत. परंतु स्वामी यांना पोस्टिंग मिळण्यासाठी बरीच अडचण निर्माण झाल्याचे दिसून येत आहे. पोस्टिंग न मिळाल्याने त्यांनी सोलापुरातील मुक्काम वाढविला असून भाड्याच्या घरात जाणे पसंत केल्याचे दिसून येत आहे.