झेडपीचे डेप्युटी सीईओ इशाधीन शेळकंदे यांचे कौतुक
सीईओ मनीषा आव्हाळे यांनी दिले या कामाचे श्रेय

सोलापूर : ‘मेरी माटी मेरा देश” हा उपक्रम सोलापूर झेडपीने उत्कृष्टपणे राबविल्याबद्दल राज्य शासनाने अभिनंदन केले आहे. पण या कामाचे श्रेय ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी ईशाधीन शेळकंदे यांनाच आहे, असे मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे यांनी जाहीर केले आहे.
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाअंतर्गत केंद्र शासनाने ‘मेरी माटी मेरा देश” हा उपक्रम देशभर राबवला. या उपक्रमांतर्गत देशातील सर्व गावांमधील माती दिल्ली येथे उभारण्यात आलेल्या अमृतवाटीकेसाठी संकलित करण्यात आली. यात सोलापूर जिल्हा परिषदेने जिल्ह्यातील सर्व गावातील माती संकलित केली. जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागाने लोकांचा सहभाग वाढविण्यासाठी विविध उपक्रम राबविले. या उपक्रमांना गावातील नागरिकांनी जोरदार प्रतिसाद दिला. सर्व गावांमधील संकलित झालेली माती पंचायत समितीमार्फत जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्याकडे सुपूर्द करण्यात आली. जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्ह्यातील गावे, नगरपंचायत व महापालिका हद्दीतील संकलित झालेली माती राज्य शासनाकडे पाठविली. या उपक्रमात मोठ्या प्रमाणावर विविध कार्यक्रम राबविल्याबद्दल सोलापूर जिल्हा परिषदेचे राज्य शासनाने कौतुक केले आहे तसे पत्र सीईओ आव्हाळे यांना पाठविले आहे. पण आव्हाळे यांनी या कामाचे श्रेय ग्रामपंचायत विभागाचे डेप्युटी सीईओ शेळकंदे यांना दिले आहे. त्यामुळे शेळकंदे यांचे विविध स्तरातून अभिनंदन होत आहे.