सोलापूर : मोहोळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत चांगले काम करून अल्पावधीत लोकप्रिय झालेले पोलीस निरीक्षक विनोद घुगे यांची अचानकपणे बुधवारी नियंत्रण कक्षात बदली करण्यात आली आहे.
पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे यांनी बुधवारी अचानक दोन पोलीस अधिकाऱ्यांच्या नियंत्रण कक्षात बदल्या केल्या. ग्रामपंचायत निवडणुका झाल्याबरोबर जिल्ह्यातील दोन महत्त्वाच्या पोलीस ठाण्यातील पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्याने जिल्ह्यात चर्चेचा विषय झाला आहे. मोहोळ पोलीस ठाण्यात नियुक्ती झाल्यापासून चर्चेत आलेले पोलीस निरीक्षक विनोद घुगे यांनी कायदा व सुव्यवस्थेच्याबाबतीत चांगली कामगिरी केली. मोहोळ शहरातील वाहतूक सुरक्षेला त्यांनी चांगलेच महत्त्व दिले. त्यामुळे त्यांचे काम सामान्य माणसांच्या नजरेस आले. मोहोळसारख्या संवेदनशील पोलीस ठाण्याची त्यांनी चांगलीच धुरा सांभाळल्यामुळे गुन्हेगारीवरही चांगलाच वचक बसला होता. चोरी व शरीराविषयी गुन्ह्यांचे प्रमाण बऱ्याच अंशी खाली आले होते. गेल्या महिन्यात चिंचोली एमआयडीसीतील एका कारखान्यात मॅफेड्रिनचा मोठा साठा आढळला. मुंबई पोलिसांनी ही कामगिरी केल्यामुळे अंमली पदार्थाचा बाजार बराच चर्चेत आला. पोलीस महासंचालक कार्यालयाने ही कारवाई गांभीर्याने घेतल्याचे सांगण्यात येत आहे. त्याचबरोबर करकंब पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश तारू यांचीही नियंत्रण ककक्षात बदली करण्यात आली आहे. अचानकपणे दोन पोलीस अधिकाऱ्यांच्या नियंत्रण कक्षात बदल्या करण्यात आल्याने जिल्ह्यात हा चर्चेचा विषय झाला आहे.