महाआवास योजनेमध्ये निंबर्गी ग्रामपंचायत राज्यात प्रथम
सरपंच श्रीदीप हसापुरे यांच्यावर अभिनंदनचा वर्षाव

सोलापूर: प्रधानमंत्री आवास योजनेत राज्यातील सर्वोत्कृष्ट ग्रामपंचायतीमध्ये दक्षिण सोलापूर तालुक्यातील निंबर्गी ग्रामपंचायतीने 98.8 गुण मिळवून राज्यामध्ये प्रथम क्रमांक पटकावला आहे.
‘सर्वांसाठी घरे- २०२४’ या शासनाच्या धोरणांतर्गत विविध उपक्रम राबवून केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजना व राज्य पुरस्कृत रमाई आवास योजना, शबरी आवास योजना, पारधी आवास योजना. आदिम आवास योजना या सर्व ग्रामीण गृहनिर्माण योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या कामास गतिमान करणे व गुणवत्ता आणणे यासाठी १६ नोव्हेंबर २०२१ च्या शासन निर्णयान्वये २० नोव्हेंबर २०२१ ते ३० जून २०२२ दरम्यान महाआवास अभियान २०२१-२२ राबविण्यात आले. यात उपक्रमांचे मूल्यमापन करुन उत्कृष्ट काम करणान्या संस्था व व्यक्ती यांना पुरस्कार देण्याचे नियोजन करण्यात आले होते. त्यामध्ये निंबर्गी ग्रामपंचायतीने अव्वल स्थान पटकावले आहे.
याबाबत सरपंच श्रीदीप हसापुरे यांचे कौतुक होत आहे. काँग्रेसचे वरिष्ठ उपाध्यक्ष सुरेश हसापुरे यांचे ते चिरंजीव आहेत. गुणांकनासाठी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी ईशाधीन शेळकंदे, बाळासाहेब वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामसेवक नागेश जोडमोटे यांनी परिश्रम घेतले. ग्रामसेवक जोडमोटे यांनी मंद्रूप ग्रामपंचायतीनंतर निंबर्गी ग्रामपंचायतीचा झेंडा राज्यात रोवला आहे.