सोलापूर : कोणतेही वाहन चालविताना आपले घरी कोणीतरी वाट पाहत आहे याचे नेहमी भान ठेवा असे आवाहन आरटीओ अधिकाऱ्यांनी केले. जागतिक रस्ते अपघात पिडीत व्यक्ती यांच्या स्मरणदिनानिमित्त आरटीओ कार्यालय आणि वाहतकू शाखेच्यावतीने सोलापूर एस टी स्थानकावर जनजागृतीपर पथनाट्य सादर करून सुरक्षित वाहन चालविण्याबाबत शपथ देण्यात आली.

दरवर्षी नोव्हेंबर महिन्यातील तिसरा रविवार हा अपघातात बळी पडलेल्यांचा स्मरण दिन म्हणून जागतिक पातळीवर पाळण्यात येतो. या दिवशी केंद्र सरकार, राज्य सरकार, परिवहन विभाग, पोलिस वाहतूक विभाग यांच्या संयुक्‍त विद्यमाने अपघातात बळी पडलेल्यांचे स्मरण करीत त्यांना अभिवादन करून जनजागृतीपर कार्यक्रम घेण्यात येतात.
रविवारी सकाळी सोलापूर एस टी स्थानकात रंगकमी आशुतोष नाटकर यांच्या पथकाकडून सुरक्षित वाहन चालविण्याबाबत जनजागृतीपर पथनाट्य सादर करण्यात आले. वाहनाच्या अपघातात एखादा बळी गेल्यानंतर त्याची कुटुंबियांची काय परिस्थिती होते, अपघात कशाप्रकारे रोखू शकतो, अपघातातील जिवित हानी कशा प्रकारे रोखली जाऊ शकते याबाबत या पथनाट्यातून जनजागृती करण्यात आली. शेवळी सुरक्षित वाहन चालविण्याबाबत उपस्थित अधिकारी, रंगकर्मी कलाकार आणि नागरीकांनी शपथ घेतली. तसेच शहरातील सात रस्ता, महत्वाच्या गर्दीच्या ठिकाणीही जनजागृतीपर पथनाट्य सादर करून सुरक्षित वाहन चालविण्याची शपथ नागरीकांना देण्यात आली.
उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अर्चना गायकवाड, सहायक उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विजय तिरणकर, अमरसिंह गवारे, मोटार वाहन निरीक्षक महेश रायभान, वाहतूक शाखेचे पोलिस निरीक्षक तानाजी दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली मोटार वाहन निरीक्षक शितलकुमार कुंभार, शिवाजी सोनटक्के, राहुल खंदारे, सिध्दाराम पांढरे, विवेक भोसले, शिरीषकुमार तांदळे, सहायक मोटार वाहन निरीक्षक धीरज डोईफोडे, प्रियांका माने, आदिका खरात, कर्मचारी राकेश कांबळे, प्रमोदसिंह महाडीक, नामदेव व्हनमराठे यांनी या कार्यक्रमासाठी परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *