सोलापूर: राज्यात विद्यार्थी, पालक आणि शाळांमध्ये सर्वाधिक लोकप्रिय असलेल्या शालेय शिक्षण विभागाच्या पाचवी-आठवी शिष्यवृत्ती परीक्षेतील ३२ हजार ६६७ शिष्यवृत्तीधारकांना नवीन दराने १९ कोटी रुपयांचे वितरण दीपावलीच्या पार्श्वभूमीवर करण्यात आल्याची माहिती योजना शिक्षण संचालक डॉ.महेश पालकर यांनी दिली.
महाराष्ट्रात सन १९५४-५५ पासून सदर योजना कार्यान्वित आहे. ही योजना इयत्ता ४ थी व इयत्ता ७वी मध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांकरिता राबविण्यात येत असे. आता ही शिष्यवृत्ती
परीक्षा सन २०१५च्या शासन निर्णयानुसार इ.५ वी आणि इ.८वी इयत्तेत घेतली जाते. महाराष्ट्र राज्य परिक्षा परिषदेमार्फत घेण्यात येणा-या या शिष्यवृत्तीच्या स्पर्धा परिक्षेत गुणवत्ता यादीतील विद्यार्थ्याना मंजूर संचाच्या अधीन राहून या योजनेचा लाभ दिला जातो. ही शिष्यवृत्ती समाधान प्रगती व चांगल्या वर्तणूकीच्या आधारे पुढे चालू राहते.
तर योजना शिक्षण संचालनालयाचे उपसंचालक राजेश क्षीरसागर म्हणाले की,’पुर्व उच्च प्राथमिक व पुर्व माध्यमिक शाळा शिष्यवृत्ती’ ही शिष्यवृत्ती गुणवान विद्यार्थ्यांना शैक्षणिक प्रोत्साहनात्मक देण्यात येते. इयत्ता ५ वी साठी एकूण संच संख्या १६,६८३ एवढी असून इयत्ता ८ वी साठी १६,२५८ संच संख्या आहे.दरवर्षी इ .५ वीच्या परीक्षेतून शिष्यवृत्तीधारक ठरलेल्या आणि पुढे इ .६ वी, ७ वी, ८ वी मध्ये शिक्षण घेणाऱ्या एकूण ५०,०४९ विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्यात येते. तर इ .८ वीच्या परीक्षेतून शिष्यवृत्तीधारक ठरलेल्या आणि इयत्ता ९ वी व इयत्ता १० वी मध्ये शिक्षण एकूण ३२,५१६ विद्यार्थ्यांना ही वार्षिक शिष्यवृत्ती देण्यात येते.
परीक्षेतून गुणवत्तेच्या आधारे शिष्यवृत्तीधारक ठरल्यानंतर योजना शिक्षण संचालनालयाकडून शिष्यवृत्तीचे वितरण विद्यार्थ्यांच्या बँक खात्यावर केले जात आहे. विद्यार्थ्यांच्या बँक खात्याची अचूक माहिती प्राप्त न होणे ही शिष्यवृत्ती वितरणातील प्रमुख अडचण आहे. सन २०२१ पर्यंत शिष्यवृत्ती प्राप्त नसलेल्या शिष्यवृत्ती धारकांनी आपल्या बँक खात्याची माहिती तालुकास्तरावर गटशिक्षणाधिकारी यांचेकडे अचूक द्यावी. सदर माहिती www.eduonlinescholarship.com या संकेतस्थळावर गटशिक्षणाधिकारी यांचेकडून अपडेट झाल्यास संबंधित विद्यार्थ्यांच्या बँक खात्यावर शिष्यवृत्ती अदा करण्यात येईल. तर २०२१ नंतर शिष्यवृत्ती धारक ठरलेल्या विद्यार्थ्यांच्या बँक खात्याची माहिती संबंधित शाळेने परीक्षा परिषदेच्या www.mscepune.in या संकेतस्थळावर शाळा लॉगीनद्वारे अचूकपणे भरणे आवश्यक आहे. त्यासाठी शिष्यवृत्तीधारकांनी शाळेच्या मुख्याध्यापकाकडे संपर्क साधावा.
शासन निर्णय दि .२२.०७.२०१० अन्वये सन २०२२-२३ पर्यंत विद्यार्थ्यांना संचनिहाय जुन्या विविध दराने वार्षिक (इयत्ता पाचवी कमाल एक हजार व इयत्ता आठवी कमाल दिड हजार रुपये) शिष्यवृत्तीचे वितरण करण्यात येत होते. चालू वर्षापासून सन २०२३ पासून सरसकट इयत्ता पाचवी ५ हजार इयत्ता आठवी ७,५०० अशी शिष्यवृत्तीच्या दरामध्ये सुधारणा करण्यात आली आहे. त्याप्रमाणे विद्यार्थ्यांना सन २०२३-२४ पासून वाढीव दराने शिष्यवृत्तीचे वितरण करण्यात येत आहे.
शासन निर्णय दि .३.७.२०२३ अन्वये इयत्ता ५ वी साठी प्रतिमहा रु .५०० याप्रमाणे दहा महिन्यासाठी रु .५हजार व इयत्ता ८ वी साठी प्रतिमहा रु. ७५० याप्रमाणे दहा महिन्यासाठी रु ७ हजार ५०० प्रमाणे शिष्यवृत्तीच्या रक्कमेत वाढ करण्यात आली आहे. सदर शिष्यवृत्तीसाठी सन २०२३-२४ मध्ये एकूण चार लेखाशीर्षा अंतर्गत रक्कम चाळीस कोटी चाळीस लाख फक्त रुपये मंजूर आहे. सन २०२३-२४ मध्ये विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती वितरणासाठी रक्कम एकोणपन्नास कोटी चौऱ्याण्णव लाख पन्नास हजार रुपये आवश्यक आहेत. त्यापैकी नुकताच शासनस्तरावरुन एकोणीस कोटी एकोणचाळीस लाख एकोणीस हजार रुपये निधी प्राप्त झाला आहे. सदरचा निधी सध्या इयत्ता ७ वी इ. ८ वी व
इयत्ता १० वी मध्ये शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना त्यांच्या बँक खात्यावर वितरीत करण्यात आला आहे. नवीन दराने पहिल्यांदाच शिष्यवृत्तीचे वितरण होत आहे. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर शिष्यवृत्ती वितरणासाठी योजना अधिकारी मंगल वाव्हळ, अश्विनी साठे यांनी विशेष परिश्रम घेतले.
“उर्वरित विद्यार्थ्यांना नवीन दराने शिष्यवृत्ती वितरित करण्यासाठी आवश्यक निधीची राज्य शासनाकडे मागणी केलीआहे,निधी प्राप्त होताच उर्वरित सर्व विद्यार्थ्यांनाही शिष्यवृत्ती वितरण करण्यात येईल.”
-डॉ महेश पालकर
शिक्षण संचालक (योजना)पुणे
नवीन विद्यार्थ्यांनी असा करावा अर्ज…
परीक्षा परिषदेकडून घेतल्या जाणाऱ्या शिष्यवृत्ती परीक्षेतून ५वी,८वी शिष्यवृत्तीधारकांची निवड केली जाते, तर योजना शिक्षण संचालनालयाकडून शिष्यवृत्तीचे वितरण केले जाते. चालू शैक्षणिक वर्ष २०२३-२४ करिता १८ फेब्रुवारी रोजी संपूर्ण राज्यात एकाच वेळी शिष्यवृत्ती परीक्षा घेण्यात येणार आहे. त्यासाठी परीक्षा परिषदेच्या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू असून ९नोव्हेंबर पर्यंत राज्यातील ३४ हजार ४३२ शाळांमधील इयत्ता पाचवीच्या ३ लाख ७७ हजार ८०६ आणि आठवीच्या २ लाख ८२ हजार ४५७ विद्यार्थ्यांनी ऑनलाइन अर्ज भरले आहेत. नियमित शुल्कासह ऑनलाइन अर्ज भरण्याचा अखेरचा दिनांक ३० नोव्हेंबर तर विलंब शुल्कासह १५ डिसेंबर आहे.