जिल्हाधिकारी आशीर्वाद घेणार आमदारांच्या पीएचा ‘तास”
राजकुमार सारोळे
सोलापूर: जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या संवेदनशीलतेची कल्पना त्यांच्या कार्यपद्धतीवरून जिल्हावाशियांना दिसून आली आहेच. या दृष्टिकोनातूनच त्यांनी जिल्ह्यातील विकासकामांना गती देण्यासाठी आणखी एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. दर सोमवारी ते आता जिल्ह्यातील सर्व आमदारांच्या पीएसाठी एक तास वेळ देणार आहेत.
मागील आठवड्यात करमाळ्याचे आमदार संजयमामा शिंदे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांना भेटण्यासाठी आले होते. त्यावेळी झालेल्या चर्चेत त्यांनी अत्यंत महत्त्वाचे काम असेल तरच मी सोलापुरात येतो, नाहीतर माझी सर्व कामे माझे स्वीय सहाय्यक संजय आंबोले हेच मार्गी लावतात असे सांगितले होते. नेमका हाच धागा पकडून आमदारांच्या मतदार संघातील सर्व विकास कामांचा पाठपुरावा त्यांचे पीए करत असल्याने हे हेरून या कामात अडचणी येऊ नये यासाठी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी आता दर सोमवारी सकाळी 11 वाजता सर्व आमदारांच्या पीएसाठी एक तास वेळ दिला आहे. या काळात महसूलमधील सर्व अधिकारी उपस्थित असतील. आमदारांनी आपल्या मतदारसंघातील दिलेल्या विकास कामांचे प्रस्ताव व त्या कामाबाबतची प्रगती याबाबत आढावा घेऊन हे प्रश्न तातडीने मार्गी लावण्याचा जिल्हाधिकाऱ्यांचा दृष्टिकोन आहे. त्यांच्या या निर्णयाचे सर्व आमदारांनी स्वागत केले आहे.