झेडपी पद भरतीच्या पहिल्याच परीक्षेला 73 जण गैरहजर
सोलापूर : जिल्हा परिषदेच्या रिक्त पदासाठी जाहीर करण्यात आलेल्या भरतीसाठी शासनाने नियुक्ती केलेल्या कंपनीमार्फत परीक्षेला सुरुवात झाली असून पहिल्याच दिवशी 73 जण परीक्षेला गैरहजर राहिले आहेत.
जिल्हा परिषदेच्या रिंगमन व वरिष्ठ लेखा सहाय्यक या दोन पदासाठी शनिवारी सोलापुरातील चार केंद्रावर परीक्षा घेण्यात आली. पहिल्या दिवशीच्या परीक्षेला 73 जण गैरहजर राहिल्याचे दिसून आले.
सिंहगड कॉलेजमधील दोन केंद्र, पाम इन्फोटेक व सोलापूर डिजिटल हब या चार केंद्रावर परीक्षा सुरु झाल्या आहेत. सिंहगड केंद्रावर रिंगमन या पदासाठी 27 पैकी 23 जणांनी हजेरी लावून पेपर दिला, चारजण परीक्षेला गैरहजर राहिले तर वरिष्ठ लेखा सहाय्यक या पदासाठी चार परीक्षा केंद्रावर 265 जणांनी हजेरी लावून परीक्षा दिली. वरिष्ठ लेखा सहाय्यक पदाच्या परीक्षेला अर्ज भरलेल्यांपैकी 69 जण गैरहजर राहिले. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे यांच्या मार्गदर्शनाखाली व प्रशासनाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी स्मिता पाटील यांच्या देखरेखीखाली या परीक्षेला सुरुवात झाली आहे. शासनाने नियुक्त केलेल्या कंपनीमार्फत या परीक्षा घेतल्या जात असून परीक्षा केंद्रावर पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.