सोलापूर : महाराष्ट्र जीवन प्राधिकरणकडून जलजीवन मिशन योजनेची थट्टा उडवली जात असल्याचे चित्र आहे. सोलापूर जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणी पुरवठा विभागाला कनिष्ठ अधिकाऱ्याची प्रभारी म्हणून नियुक्ती केल्यामुळे अधिकारी नाराज झाले आहेत.
हरघर नल योजनेअंतर्गत केंद्र शासनाने जलजीवन मिशन ही ग्रामीण भागातील लोकांना पिण्याचे पाणी मिळावे म्हणून मोठी महत्त्वकांक्षी योजना आणली आहे. या योजनेतून सोलापूर जिल्ह्याला पहिल्या टप्प्याला साडेआठशे कोटी मंजूर झाले आहेत. या योजनेचे टेंडर मंजूर करतानाच घोळ घातला गेला. यावरून जिल्हा नियोजन सभेत गदारोळ झाला. तत्कालीन पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी योजनेची चौकशी लावली. यात महाराष्ट्र जीवन प्राधिकरणकडून आलेले कार्यकारी अभियंता दीपक कोळी यांच्यावर ठपका ठेवण्यात आला. त्यामुळे त्यांनी बदली करून घेतली. त्यानंतर प्रभारी म्हणून पाटील यांची नियुक्ती झाली. पण पदभार घेतल्यापासून त्यांनी सावधगिरीनेच कामकाज केले. पुढील काम करण्यास त्यांनी असमर्थता दर्शविल्यावर महाराष्ट्र जीवन प्राधिकरणकडून आता कनिष्ठ अभियंता संतोष गाडेकर यांची नुकतीच नियुक्ती केली आहे. गाडेकर हे यापूर्वी वादग्रस्त ठरले असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यांच्यापेक्षा जिल्हा परिषदेकडे असलेले उप अभियंता सीनियर आहेत. त्यामुळे त्यांच्या हाताखाली आता काम करायचे काय? असा सवाल उपस्थित केला जात आहे. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणकडेही सीनियर अधिकारी असताना गाडेकर यांची वशिलेबाजीने नियुक्ती करण्यात आल्याचा आरोप होत आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे यांनी पदभार घेतल्यापासून जलजीवन योजना मार्गी लावण्यासाठी आटोकाट प्रयत्न सुरू केले आहेत. त्यांच्यामुळेच या योजनेला चांगली गती मिळालेली असतानाच महाराष्ट्र जीवन प्राधिकरणकडून आलेल्या अधिकाऱ्यांमुळे ब्रेक लागला जात असल्याबद्दल नाराजी व्यक्त होत आहे.

More Stories
सोलापूर झेडपी पदाधिकाऱ्यांकडून मुख्यमंत्री फडणवीस यांचे स्वागत
पंढरपूर कॉरिडॉरचे काम कोणावरही अन्याय न करता योग्य पुनर्वसन करून पूर्ण करणार
मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ‘निर्मलवारी-समृद्धवारी’ व ‘चरणसेवा’ उपक्रमाचा समारोप