
सोलापूर : शहरातील लोकसेवा हायस्कूल जवळून आपल्या तीन महिन्यांच्या बाळाला डोस देण्यासाठी निघालेल्या एका आईला कुत्र्याने भर रस्त्यात घेरून चावा घेतला. त्यानंतर या कुत्र्याला लस दिल्यावर त्याचा मृत्यू झाला. हे मेलेले कुत्रे घेऊन प्रहारचे कार्यकर्ते महापालिकेत आल्यामुळे गोंधळ उडाला.
संबंधित महिलेवर कुत्र्याने हल्ला केल्यावर तिने कसेबसे आपला बचाव केला. यानंतर परिसरातील नागरिकांनी राहत एनिमल्स या संस्थेच्या त्यांना बोलावले व त्यांनी या कुत्र्याला इंजेक्शन देताच तो कुत्रा मरण पावला. सोलापूर शहर परिसरात मोठ्या प्रमाणात मोकाट कुत्र्यांचा वावर वाढल्याने अशा घटना वारंवार होत आहेत. अशा घटनेची माहिती प्रहार जनशक्ती पक्षाच्या माध्यमातून महापालिकेच्या अधिकाऱ्यांना वारंवार देत असतानासुद्धा याकडे दुर्लक्ष होत असल्याने प्रहार जनशक्ती पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आक्रमक भूमिका घेतली. होत या ठिकाणी त्या कुत्र्याचा मृतदेह महानगरपालिकेच्या मोठ्या गेटमधून आयुक्तांच्या केबिनमध्ये नेण्याचा प्रयत्न करत असताना पोलिसांनी बाहेरच्या कार्यकर्त्यांना अडवले. प्रहार जनशक्ती पक्षाचे पदाधिकारी आणि पोलिसांमध्ये झटापट झाली. या आंदोलनामुळे महापालिकेत मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त लावण्यात आला होता. आंदोलन होत असल्याची माहिती मिळताच महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे हे त्या ठिकाणी येऊन प्रहार जनशक्ती पक्षाच्या पदाधिकाऱ्यांबरोबर बैठक घेतली. शहरातील मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याचे आश्वासन दिले.याप्रसंगी प्रहार जनशक्ती पक्षाचे शहराध्यक्ष अजित कुलकर्णी, जिल्हा संपर्कप्रमुख जमीर शेख, शहर कार्यकारी अध्यक्ष खालीद मनियार, शहर उपाध्यक्ष मुदसर हुंडेकरी , प्रमोद इंगळे , संभाजी व्हनमाने, शब्बीर शेख , अयाज बांगी आदी उपस्थित होते.