सोलापूर : एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक अश्विनी भोसले यांचे बंद घर फोडून चोरट्याने 120 ग्रॅम वजनाच्या सोन्याच्या बांगड्या व 35 हजाराची रोकड असा सुमारे सहा लाख 35 हजाराचा ऐवज चोरून नेला आहे. पोलीस अधिकाऱ्याचे चोरट्याने घर फोडल्यामुळे सोलापुरात खळबळ उडाली आहे
पोलीस निरीक्षक अश्विनी भोसले या विजापूर नाका पोलीस ठाण्याच्या हद्दीत विजापूर रोडवर असलेल्या पाटीलनगर येथे राहतात. चोरट्याने बंद घर फोडून आतील सुमारे सहा लाख रुपये किमतीच्या सोन्याच्या 120 ग्रॅमच्या सहा बांगड्या आणि पस्तीस हजार रुपये रोख असा ऐवज लंपास केला आहे. ही चोरी १६ ते १८ डिसेंबर २०२३ दरम्यान झाली आहे. पोलीस निरीक्षक अश्विनी भोसले यांच्या आई मुंबईला राहतात त्या आजारी असल्याचे कळाल्यावर 16 डिसेंबर रोजी घराला कुलूप लावून त्या मुंबईला आईला भेटण्यासाठी गेल्या होत्या. 18 डिसेंबर रोजी दुपारी बारा वाजता पोलीस शिपाई मंगेश गायकवाड यांचा त्यांना फोन आला. घराचे कुलूप तुटलेले आहे आतील सामानाची उलथापालत झाली आहे अशी त्यांनी माहिती दिली. रजा संपल्यानंतर 22 डिसेंबर रोजी त्या घरी परत आल्यानंतर घरातील चोरीचा प्रकार उघडकीस आला आहे. याबाबत पोलीस निरीक्षक अश्विनी भोसले यांनी विजापूर नाका पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. पोलीस अधिकाऱ्याचे घर चोरट्याने फोडले मग सामान्याचे काय? अशी चर्चा आता लोकांमध्ये सुरू झाली आहे.