सोलापूर : अण्णासाहेब आर्थिक मागास विकास महामंडळमार्फत जिल्ह्यातील 7 हजार 12 नव उद्योजकांना 56 कोटी 22 लाख रुपयांचा व्याज परतावा दिला आहे अशी माहिती पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी शुक्रवारी येथे बोलताना दिली. त्याचबरोबर महात्मा ज्योतीराव फुले जन आरोग्य योजना व प्रधानमंत्री जन आरोग्य योजना या अंतर्गत जिल्ह्यात 7 लाख 92 हजार गोल्डन कार्ड तयार करण्यात आली आहेत. या लाभार्थ्यांना प्रति वर्षी, प्रतिकुटुंब 5 लाखाचा आरोग्य विमा कवच उपलब्ध करून देण्यात आले आहे. ही सेवा जिल्ह्यातील 51 व जिल्हयाबाहेरील अंगीकृत रुग्णालयांमध्ये मिळत आहे. या अंतर्गत शासनाकडून जिल्ह्यातील जवळपास आठ लाख कुटुंबांना वैद्यकीय उपचारासाठी विमा कवच उपलब्ध करून ‘सर्वांसाठी आरोग्य’ ही संकल्पना जोपासली असल्याचे प्रतिपादन त्यांनी केले.

पोलीस परेड ग्राउंड येथे आयोजित भारतीय प्रजासत्ताक दिनाचा 74 व्या वर्धापन दिनानिमित्तच्या मुख्य शासकीय ध्वजारोहणप्रसंगी पालकमंत्री चंद्रकांत पाटील मार्गदर्शन करत होते. यावेळी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, महापालिका आयुक्त शितल तेली, पोलीस आयुक्त राजेंद्र माने, मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे, जिल्हा पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, अपर जिल्हाधिकारी तषार ठोंबरे, निवासी उपजिल्हाधिकारी दादासाहेब कांबळे यांच्यासह स्वातंत्र्य सैनिक, ज्येष्ठ नागरिक, पालक, विद्यार्थी व अन्य मान्यवर उपस्थित होते.

शासनाने अशा विविध सणाच्या अनुषंगाने आनंदाचा शिधा गोरगरीब लाभार्थ्यांना वाटप करून त्यांच्या सण आनंदित करण्याचा प्रयत्न केला आहे. तसेच सोलापूर शहरात 19 शिव भोजन केंद्र मार्फत प्रतिदिन जवळपास 54 हजार लाभार्थ्यांना दहा रुपयात शिवभोजन थाळी उपलब्ध करून देऊन शासन गोरगरीब लाभार्थ्यांना अन्न उपलब्ध करून देत आहे, असे पालकमंत्री पाटील यांनी सांगितले.

जिल्ह्यात टंचाई सदृश्य परिस्थिती आहे. तरी सर्व संबंधित जिल्हा व तालुका स्तरीय यंत्रणांनी पाणी व चारा टंचाईच्या उपाययोजना राबविताना गावनिहाय काटेकोरपणे नियोजन करावे. तसेच प्रत्येक गावात महात्मा गांधी रोजगार हमी योजनेअंतर्गतच्या शेल्फ वरील कामाची संख्या मुबलक प्रमाणात ठेवावी. संबंधित गावातील लोकांची कामाची मागणी आल्यास तात्काळ त्यांना त्याच गावाच्या परिसरात रोजगार उपलब्ध होईल यासाठी यंत्रणांनी दक्षता घ्या घेण्यास सुचित करण्यात आलेले आहे. जिल्हा परिषदेने ग्रामीण भागाकरिता पाणी टंचाई निवारणार्थ माहे- ऑक्टोंबर 2023 ते जून-2024 अखेर टंचाई आराखडा मंजूर असून या अंतर्गत 9 उपायोजनामध्ये 3 हजार 21 उप योजना राबविण्यासाठी 55 कोटीचा निधी मंजूर करण्यात आलेला आहे. या टंचाई परिस्थितीचे गांभीर्य ओळखून कोणीही कोणत्याही प्रकारचा हलगर्जीपणा करू नये. सकारात्मक दृष्टिकोन ठेवून टंचाई वरील उपाय योजनांची अत्यंत प्रभावीपणे अंमलबजावणी करावी असे आवाहन पालकमंत्री पाटील यांनी केले.

यावेळी विविध विभागांच्या पुरस्काराचे वितरणही पालकमंत्र्यांच्या हस्ते संपन्न झाले. त्यांची नावे पुढील प्रमाणे- पोलीस आयुक्तालय: शहर वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनिल दोरगे, महिला पोलीस हवालदार सीमा डोंगरीतोट, जिल्हा क्रीडा कार्यालय, शरणबसवेश्वर वांगी, तालुका कृषी अधिकारी प्रविणकुमार जाधव, बी.डी.कदम, कृषी सहायक संग्राम गवळी, अधीक्षक जीवन महासी, वाहनचालक हुसेन तांबोळी, शिपाई माजीद मनुरे यांचा पालकमंत्री यांच्याहस्ते मानचिन्ह व प्रशस्तीपत्रक देऊन सन्मान करण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *