सोलापूर : भूजल योजना, भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा तसेच पाणीपुरवठा व स्वच्छता विभागांतर्गत राबविण्यात आलेल्या भूजल समृद्ध ग्राम स्पर्धा- २०२२-२३ चे निकाल बुधवारी (ता. २४) जाहीर झाले आहेत. यामध्ये जिल्हा स्तरावर पुरंदर तालुक्यातील सोनोरी या गावाने द्वितीय क्रमांक पटकावला आहे.
भूजलाच्या अनियंत्रित उपशामुळे भूजल पातळीत होत असलेली घसरण व बाधित होत असलेली गुणवत्ता थांबविण्याकरिता केंद्र शासन व जागतिक बँक अर्थसहाय्यीत अटल भूजल योजना २६ नोव्हेंबर २०२० पासून महाराष्ट्रात १३ जिल्ह्यात ४३ तालुक्यातील एक हजार १३३ ग्रामपंचायतींमध्ये राबविण्यात येत आहे. ‘लोकसहभागातून भूजल व्यवस्थापन’ साध्य होण्यासाठी पाणीपुरवठा व स्वच्छता सन २०२२-२३ मध्ये पुरंदर तालुक्यातील २२ ग्रामपंचायतीने स्पर्धेमध्ये सहभाग घेतला होता. सहभाग घेतलेल्या ग्रामपंचायतींची एकूण 550 गुणांसाठी स्पर्धा घेण्यात आली. स्पर्धेचे मूल्यांकन उपविभाग स्तर, जिल्हास्तर व राज्यस्तर या तीन स्तरांवर करण्यात आले, त्यानुसार या स्पर्धेचा निकाल पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचे प्रधान सचिव यांनी जाहीर केला आहे. अटल भूजल योजनेंतर्गत भूजल समृद्ध ग्राम स्पर्धेचे आयोजन केले होते. यातील उत्कृष्ट लोकसहभाग नोंदविणाऱ्या आणि काम करणाऱ्या ग्रामपंचायतींना २०२२-२३ आणि २०२३-२४ या दोन आर्थिक वर्षांसाठी पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आले .ग्रामस्तरावर जलअंदाजपत्रक तयार करणे, भूजल उपलब्धतेतील तूट भरून काढण्यासाठी अस्तित्वातील राज्य व केंद्र पुरस्कृत योजनांचे अधिकाधिक अभिसरण करणे व ग्रामस्तरावरील भूजल उपलब्धतेत शाश्वतता साध्य करणे आदी या योजनेची उद्दिष्टे आहेत. स्पर्धेत राज्यस्तरावर प्रथम क्रमांकास एक कोटी रुपये, द्वितीय क्रमांकास ५० लाख रुपये तर तृतीय क्रमांकास ३० लाख रुपये बक्षीस आणि जिल्हास्तरीय प्रथम क्रमाकांस ५० लाख, द्वितीय क्रमांकास ३० लाख तर तृतीय क्रमाकांस २० लाख रुपयांचे बक्षीस मिळले. २६ जानेवारी २०२४ प्रजासत्ताक दिनी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री पुणे जिल्हा अजितदादा पवार, विभागीय आयुक्त सौरभ राव, पुण्याचे जिल्हाधिकारी डॉ राजेश देशमुख, वरिष्ठ भूवैज्ञानिक दिवाकर धोटे यांच्या हस्ते पुरंदर तालुक्यातील सोनोरी ग्रामपंचायतीला 30 लाख बक्षीसासह पुणे जिल्हयात द्वितीय क्रमांक देण्यात आला,
सोनोरी ग्रामपंचायतीमार्फत गेल्या दोन वर्षांपासून पाणीबचत व त्यासाठी धोरण राबवून भुजल साठा वाढवला असून, श्री सिध्दांत इंगळे यांच्या प्रयत्नातून BPCL कंपनीमार्फत सीएसआर फंडामधून ९०लक्ष रुपये खर्च करून बंद पाइपलाइन करून विक्रमी शेततळी घेऊन ८० टक्के ठिबक सिंचनाद्वारे पाणी दिल्याने पाणी वापरात मोठी बचत झाली आहे, तसेच कमी पाण्यावरील पिकं घेऊन पिक बदल करण्यात आला आहे, तसेच खोल विहिरींना बंदी, बोअरवेल बंदी करून अतिपाणी उपसा यावर निर्बंध घालण्यात आले आहे, तसेच शासनाच्या वतीने प्रशिक्षण शिबिरे आयोजित करुन ग्रामस्थांमध्ये जनजागृती केली आहे त्यामुळे ग्रामस्थांचा लोकसहभाग वाढला आहे तसेच ओढा खोलीकरण करून पाणीसाठा वाढवला आहे या कामासाठी शासनाच्या वतीने सोनोरी ग्रामपंचायतीला 30 लाख बक्षीसासह पुणे जिल्हयात द्वितीय क्रमांकाने गौरविण्यात आले आहे.