सोलापूर :- नाटक आणि कलावंताना चांगले दिवस येण्यासाठी लोकाश्रयासोबतच राजाश्रय मिळाला पाहिजे. रसिकांकडून भरभरून दाद आणि प्रतिसाद मिळाला तरच नाट्यसृष्टी जिवंत राहणार आहे, असे प्रतिपादन नाट्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष तथा सोलापूरचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी केले.
100 व्या अखिल भारतीय विभागीय नाट्य संमेलनाचा हस्तांतरण सोहळा नॉर्थकोर्ट मैदानावरील रंगकर्मी नामदेव वठारे रंगमंचावर रविवार दि. 28 जानेवारी रोजी पार पडला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी संमेलनाचे अध्यक्ष जब्बार पटेल, नाट्य परिषद मध्यवर्ती शाखेचे कोषाध्यक्ष सतीश लोटके, सिने नाट्य कलाकार किशोर महाबोले, निलम शिर्के सामंत, दिपक करंजीकर, मराठी बाणाचे अशोक हांडे, अतुल परचुरे, सोलापूर विद्यापीठाचे प्र.कुलगुरू लक्ष्मीकांत दामा, प्रा.शिवाजी सावंत, संमेलनाचे कार्याध्यक्ष प्रकाश यलगुलवार, प्रमुख कार्यवाह विजय साळुंके, सह कोषाध्यक्ष अविनाश महागांवकर, समन्वयक मोहन डांगरे, स्वागत सचिव प्रशांत बडवे, प्रिसिजन फौंडेशनच्या सुहासिनी शहा, तेजस्वीनी कदम, बीडच्या दीपा क्षिरसागर, नियामक मंडळाचे दिलीप कोरके, संजय रहाटे तसेच सोलापूर जिल्ह्यातील नाट्य परिषद शाखेचे अध्यक्ष, पदाधिकारी आदी मान्यवरांची उपस्थिती होती.
माणसाच्या मनाला आतून आनंद देण्याचे काम नाटक, नृत्य, गीत, सिनेमा यातून होते. प्रत्येकाच्या चार भूक आहेत. पोटाची भूक, बुध्दीची भूक, मनाची भूक आणि आत्म्याची भूक अशा चार भूका माणसाला असतात. त्यातील मनाची भूक ही कलावंताकडून भागवली जाते. कलावंत आपल्या मनातील भूक भागवतात तसेच आपण रसिकांनी त्यांच्या पोटाची भूक भागवली पाहिजे. नाट्यक्षेत्र आणि त्यातील सर्व कलावंताना लोकाश्रया सोबतच राजाश्रयही मिळाला तर नाट्य चळवळ पुढे जावू शकते, असेही स्वागताध्यक्ष तथा पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी सांगितले.
नव्या पिढीत कलावंत घडवायचे असतील तर विद्यापीठात कला विभागाला शासनाकडून भरघोस निधीची तरतूद केली पाहिजे. मुंबई पुण्यात होणारी चांगली नाटके सोलापूरसह महाराष्ट्रातील इतर शहरापर्यत आली तरच नाट्य चळवळ जिवंत राहू शकणार आहे.
- शासनाकडून नाट्य परिषदेसाठी 9 कोटी 33 लाखाचा निधी मिळाला त्यातून अनेक स्पर्धा नाट्य परिषद राबवणार आहे. त्याचबरोबर रंगकर्मींसाठी घरकुल, आरोग्य अशा सुविधा उपलब्ध करण्यासाठी नाट्य परिषद प्रयत्न करणार आहे. हे 100 वे नाट्य संमेलन अजून 5 महिने सुरू राहणार असून बीड, लातूर, मुंबई असे संमेलन आयोजन करून शेवटी रत्नागिरीमध्ये या 100 व्या नाट्य संमेलनाचा समारोप होणार आहे, असे कोषाध्यक्ष सतीश लोटके यांनी सांगितले.
सोलापूरचे संमेलन पार पाडण्यासाठी अनेकांनी मदतीचा हात दिला. गेल्या दोन महिन्यापासून हे नाट्य संमेलन सोलापूरला व्हावे म्हणून सोलापूरच्या रसिक श्रोत्यांसह सोलापूरमधील सर्व 8 नाट्य परिषदेच्या 8 शाखेच्या सर्व अध्यक्ष आणि पदाधिकारी यांनी प्रचंड मेहनत घेतली, असे आपल्या मनोगतामधून विजय साळुंके यांनी सांगितले.
प्रारंभी पंढरपूर तालुक्यातील कोर्टी येथील सिंहगड पब्लिक स्कुलच्या विद्यार्थ्यांकडून सामुहिकपणे तबला वादन करून गीत सादर केले. त्यानंतर 100 व्या अखिल भारतीय मराठी विभागीय नाट्य संमेलन हस्तांतरण सोहळ्याच्या कार्यक्रमाला मान्यवरांच्या हस्ते नटराज पूजनाने सुरूवात करण्यात आली. त्यानंतर स्वागत सत्कार करण्यात आला यावेळी सोलापूर मधील ज्येष्ठ रंगकर्मींच सत्कार करण्यात आला. शेवटी नटराज मूर्ती आणि घंटा बीडच्या नाट्य परिषद शाखेच्या अध्यक्षा दीपा क्षीरसागर यांच्याकडे सुपूर्द करुन हस्तांतर सोहळा पार पडला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कृष्णा हिरेमठ यांनी केले.
नाट्य परिषदेच्या शाखांचे कौतुक
अखिल भारतीय नाट्य परिषद मुंबईच्या 100 व्या विभागीय नाट्य संमेलनाचे आयोजन यशस्वीपणे करून दाखवल्याबद्दल पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सोलापूरच्या नाट्य परिषदेच्या 8 शाखांच्या पदाधिकाऱ्यांचे कौतुक केले तसेच विजयदादा साळुंके यांचे विशेष कौतुक करीत त्यांनी आपल्या हातातील घड्याळ रंगमचांवरच काढून विजयदादा साळुंके यांना भेट देवून हातात घालून दाद दिली.
नटरंग स्मरणिका प्रकाशन
100 व्या नाट्यसंमेलनाच्या निमित्ताने सोलापूरच्या नाट्य परिषद शाखेच्या वतीने सोलापूर मधील नाट्यक्षेत्रातील विविध घडामोडीचा आढावा घेणारी नटरंग नावाची स्मरणिका काढण्यात आली त्याचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. या नटरंग स्मरणिकेच्या संपादक रंगकर्मी शोभा बोल्ली यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. यावेळी बोलताना शोभा बोल्ली यांनी सांगितले की मी कन्नड भाषिक आणि माझा नवरा तेलगू भाषिक असतानाही मला मराठी नाट्य संमेलनाच्या स्मरणिका काढण्याचा आणि त्याचे संपादन करण्याचा मान मिळाला हे माझे भाग्य आहे.