सोलापूर : पंढरपूर तालुका पोलीस ठाण्याचे दबंग वरिष्ठ पोलीस इन्स्पेक्टर तय्यब मुजावर यांनी वाळू तस्करांविरुद्ध मोहिम उघडत चक्क जेसीबीसह 46 लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
पंढरपूर तालुक्यातील शेगाव आणि चिंचोली भोसे येथे अवैधरित्या वाळू वाहतुकीवर पंढरपूर तालुका पोलीस ठाण्याच्या पथकाने धडक कारवाई केली आहे . एकूण 46 लाख 53 हजार मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून एकूण सात वाहने जप्त केली आहेत. यात जेसीपीसह पाच आरोपींना अटक करण्यात आली आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली अप्पर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर, उपविभागीय पोलीस अधिकारी अर्जुन भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक टी. वाय. मुजावर, सहाय्यक पोलीस निरीक्षक ओलेकर, हेड कॉन्स्टेबल गजानन माळी, क्षीरसागर घंटे, राहुल जगताप, पाडकर, वाडदेकर यांच्या पथकाने ही कारवाई केली. पोलीस निरीक्षक तयब मुजावर यांची आतापर्यंतची कारकीर्द दबंग राहिली आहे. सोलापुरात पोलिस आयुक्तालयात असताना अनेक त्यांनी गुन्हे उघड केलेले आहेत.
जिल्ह्यात मंद्रूप, मोहोळ, सोलापूर तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीत सीना व भीमा नदीतून अवैध वाळू उपसा सुरूच आहे. वाळू तस्कर मध्यरात्रीनंतर ट्रॅक्टर, जुन्या टेम्पोतून वाळूची अवैधपणे वाहतूक करताना दिसत आहेत. या पोलीस ठाण्याच्या हद्दीतही वाळू तस्करांविरुद्ध अशीच मोहीम राबवावी अशी मागणी होत आहे.