सोलापूर : सोलापूर शहरातील प्रमुख चौकांमध्ये बसविलेल्या सीसीटीव्ही कॅमेरावरून टिपलेल्या छबीवरून वाहतूक पोलिसांनी वाहतुकीचे नियम तोडणाऱ्या वाहनधारकांवर दंडात्मक कारवाई सुरू केली आहे. सीसी कॅमेऱ्याने टिपलेल्या छबी सिटी पोलिसांनी आपल्या फेसबुकपेजवर टाकल्यावर लोकांनी ‘याला” खेळरत्न पुरस्कार द्यायला पाहिजे, अशा प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.
सोलापूर शहरातील वाहतूक व्यवस्था राज्यभर चर्चेत असते. शहरातील प्रमुख चौका -चौकामधील वाहतुकीची स्थिती पाहिली की बर्याच वाहनधारकांना वाहतुकीच्या नियमांचे काय देणे घेणे आहे की नाही? असा सर्वसामान्यांना प्रश्न पडतो. अशा वाहनधारकावर जरब बसण्यासाठी पोलिसांनी कारवाई सुरू केली की लोकांमधून ओरड सुरू होते. ट्रिपलसीट मोबाईलवर बोलत वाहन चालवणे, रिक्षामध्ये फ्रंटशीट, वाकडेतिकडे वाहन चालवणे, अचानक उजवीकडे वळणे हे सोलापुरामधील वांधारकांची नित्याची सर्कस आहे. चुकीच्या पद्धतीने वाहन चालवणाऱ्याला काही सांगायचे झाले की मुद्दा बाचा बाचीवर येऊन बसतो. त्यामुळे कोणाला कोण सांगायचं? चला पुढे अशा नियमात सोलापूरकरांची वाहन व्यवस्था सुरू आहे. अशात आता सोलापूर महानगरपालिकेच्या स्मार्ट सिटी योजनेतून शहरातील प्रमुख चौकांमध्ये सीसी कॅमेरे बसविण्यात आले आहेत. या कॅमेऱ्यावर देखरेख ठेवण्यासाठी सेंट्रल कंट्रोलरूम सुरू करण्यात आली आहे. या कंट्रोल रूमवरून चौकातून वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या वाहनधारकाचे फोटो काढून ई चलनची दंडात्मक कारवाई सुरू झाली आहे. या सी सी कॅमेरावरुण चौकांमध्ये वाहतुकीचे नियम मोडून वाहन चालवणारे टप्प्यात आले आहेत .28 फेब्रुवारी रोजी अशा 86 वाहनधारकावर कारवाई करण्यात आली. त्यात 40 जण ट्रिपलसीट होते तर बरेच जण मोबाईलवर बोलत वाहन चालवताना सापडले. यातील एका वाहनधारकाचा फोटो पोलिसांनी आपल्या फेसबुक पेजवर अपलोड केल्यावर नागरिकांच्या तीव्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत. याला सर्कसमध्ये ठेवले, पाहिजे खेलरत्न पुरस्काराचा मानकरी, अशा प्रतिक्रिया लोकांनी दिल्या आहेत.
तर दुसरीकडे मार्चअखेर आले म्हणून वाहतूक पोलिसांनी आपले टार्गेट पूर्ण करण्यासाठी कारवाई सुरू केली का? अशा प्रतिक्रिया आल्या आहेत. इतके दिवस पोलीस काय करत होते? असाही सवाल सोशल मीडियावर उपस्थित करण्यात आला आहे तर त्याला काही जणांनी पोलीस नाक्यावर होते असे उत्तर दिले आहे. काही का असेना सोलापुरातील वाहतुकीला शिस्त लागली पाहिजे. काही ठिकाणी बंद सिग्नल आहेत ते सुरू करावेत अशी मागणी पुढे आली आहे. इतके दिवस वाहतूक पोलीस नियम तोडणारे सापडले की कारणे सांगितल्यावर दया दाखवीत असताना दिसून येत होते. साहेब पेशंट आहे म्हटल्यावर ट्रिपल सीटला दया दाखवली जात होती पण आता कॅमेऱ्याला कोण सांगणार? कॅमेरा जितके ट्रिपलसीट दिसतील तितक्या वाहनधारकावर आता ई चलान बसणार आहे. त्यामुळे वाहतूक पोलिसांचा तिरस्कार करणाऱ्यांना आता नियम पाळायचे शिकावेच लागणार आहे.
सोलापुरात सर्रास ट्रिपलसीट
सोलापुरात सर्रासपणे ट्रिपलसीट जाताना अनेक दुचाकीस्वार दिसतात. त्याचबरोबर रिक्षांमध्येही फ्रंटशीट, मोबाईलवर बोलण्याचे प्रकार वाढलेले दिसून येतात. तसेच हद्दवाढ भागात अल्पवयीन मुले दुचाकी वेगाने नेत असताना आढळतात. अशा वाहनधारकांना काही सांगितले तर तुला काय करायचे आहे? अशी उत्तरे दिली जातात. त्यामुळे वाहतूक पोलिसांनी सुरू केलेली मोहीम योग्यच आहे, अशा प्रतिक्रिया येत आहेत.