राजकुमार सारोळे
सोलापूर : अयोध्येत प्रभू श्रीरामचंद्र मंदिर निर्माणमुळे वाढलेले धार्मिक पर्यटन पाहिले तर अशाच पध्दतीने काही बदल करून पंढरपूर व अक्कलकोटला धार्मिक पर्यटनाला मोठा वाव असल्याचे दिसून येते. जिल्हा प्रशासन व स्थानिक नागरिकांच्या मदतीने हा बदल घडवून आणला तर सोलापूर जिल्ह्यालाही त्याचा मोठा फायदा होणार आहे.
आयोध्येत धार्मिक पर्यटन वाढविण्यास उत्तर प्रदेश सरकारने केलेली मोठी योजना व जिल्हा आणि नगर प्रशासनाने राबवलेली यंत्रणा महत्त्वाची भूमिका बजावत असल्याचे दिसून येते. दररोज लाखाच्यावर भाविक येत असताना त्यांच्या निवासासाठी टेन्ट सिटीची कल्पना, आरोग्य व्यवस्था, सुलभ शौचालय, स्नानासाठी तात्पुरते निवारे, नदीकाठचा घाट विकसित करून जुन्या मंदिरावर बसवलेली लेजर शो यंत्रणा याचा मेळ उत्तमप्रकारे घालण्यात आला आहे. हा बदल घडवून आणतानाच पर्यावरणपूर्वक बाबींचा प्राधान्याने विचार केल्याचे प्रकर्षाने दिसून येते. उत्तर प्रदेश सरकारने मंदिर निर्माण करतानाच भविष्यात वाढणाऱ्या पर्यटनाचा विचार करून नगराची रचना करून घेतली आहे. अयोध्येतील प्रभू श्रीरामचंद्र यांच्या मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्याचा मास्टर प्लॅन केल्याचे दिसून येते. महामार्गाने शहरात आल्यावर मुख्य लता चौकातून मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्यावर दुतर्फा बाजारपेठ वसवली आहे. ही बाजारपेठ वसविताना नगर प्रशासनाने मास्टर प्लॅन केल्याचे दिसून येते. मोठ्या रुंदीचा रस्ता निर्माण करून बाजूला एकसारखी दुकाने निर्माण केली आहेत. या दुकानाचा रंग, बांधकामाची रचना आणि दुकानावरील फलकही एकसारखे असल्याचे दिसून येते. मोठ्या रुंदीचा रस्ता करताना बऱ्याच इमारतींना मागे करण्यात आले आहे. या मास्टर प्लॅनसाठी येथील नागरिकांनी सहकार्य केल्यामुळे आज मोठे सौंदर्य निर्माण झाल्याचे दिसून येते. तसेच भाविकांना ये- जा करण्यासाठी मोठा रस्ता निर्माण झाला आहे. भाविक ये- जा करीत असतानाच त्यांना प्रसाद व इतर धार्मिक साहित्य खरेदी करण्यासाठी दुतर्फा दुकाने उपलब्ध केल्याने उलाढाल वाढली आहे. येथील चित्रा खानावळचे गुप्ता म्हणाले की पूर्वी माझा व्यवसाय काही चालत नव्हता. आता अयोध्येतील मंदिर निर्माणनंतर पर्यटन वाढल्यामुळे मला जेवणासाठीही उसंत नाही. प्रसाद विक्रेते राकेश शर्मा म्हणाले की माझ्या वडिलांनी ही जागा घेतली आहे. आज ह्या जागेची दहापट किंमत आहे. पण प्रसाद विक्रीतून माझ्या या छोट्या दुकानातून कुटुंबाला चांगला लाभ होत आहे, अशी प्रतिक्रिया व्यक्त केली. सध्या आयोध्येत इतकी गर्दी असतानाही पोलीस प्रशासनाने चोख बंदोबस्ताची बाजू व्यवस्थितपणे सांभाळल्याचे दिसून येते. गर्दीचे नियंत्रण, हरवलेल्या लोकांना मदत, चोरी व ईतर उपद्रवीबाबत उचललेली कडक पावले यामुळे दररोजचा दिवस सुरक्षित पार पडतो. बाबत मुख्यमंत्री आदित्य योगी यांचे करावे तितके कौतुक कमीच आहे. त्याचबरोबर शहरातील स्वच्छता, आलेल्या भाविकांना निवारा उपलब्ध करून देण्यासाठी नगर प्रशासनाने मोठी यंत्रणा उभी केली आहे.
त्यामुळे धार्मिक पर्यटनासाठी आयोध्या नगरीने राबविलेला मास्टर प्लॅन पंढरपूर व अक्कलकोट सारख्या ठिकाणी राबविला तर आपल्याकडेही मोठ्या प्रमाणावर धार्मिक पर्यटन वाढेल असे वाटते. महाराष्ट्र सरकारने पंढरपूरच्या विकासासाठी कॉरिडॉर मंजूर केला आहे. या प्लॅनमध्ये नेमकं काय आहे? हे स्थानिक नागरिकांनी समजावून भविष्यातील फायदा जाणून घेतल्यास सोलापूरकडेही पर्यटक वाढतील यात शंका नाही. गरज आहे ती भविष्याचा वेध घेण्याची. जिल्हा प्रशासनाने सर्वांना विश्वासात घेऊन त्या पद्धतीने कॉरिडॉर यशस्वी केले तर पंढरपूर व अक्कलकोटची देशभरात चर्चा होईल यात वाद नाही. आयोजित सध्या होणाऱ्या गर्दीचा प्रशासनाने राबविलेला प्लॅन पाहिला तर पंढरपुरात दरवर्षी आषाढी वारीसाठी होणाऱ्या गर्दीसाठी जिल्हा प्रशासनाने राबविलेला प्लॅन डोळ्यासमोर येतो. त्यामुळे यापूर्वीच महाराष्ट्र सरकारने सोलापूरचे तत्कालीन जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर व प्रशासनातील इतर अधिकाऱ्यांना आयोध्येतील या प्लॅनचा अभ्यास करण्यासाठी पाठवले होते हे येथे उल्लेखनीय.
यांचे विशेष आभार
अयोध्येच्या अभ्यास दौऱ्यासाठी आस्था रेल्वेचे संयोजक, मुंबई मंत्रालय पत्रकार संघाचे यदु जोशी, किरण जोशी, डी. एस. सिंग, सोलापूर श्रमिक पत्रकार संघाचे विक्रम खेलबुडे, आस्था रेल्वेचे केटरिंग व्यवस्थापक जितू चंदेल यांचे विशेष सहकार्य लाभले.