• राजकुमार सारोळे

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अयोध्येत प्रभू श्रीरामचंद्र यांच्या बालमूर्तीची प्रतिष्ठापना केल्यानंतर भक्तांचा महापूर आला आहे. देशभरातून भाविक प्रभू श्रीरामचंद्र यांच्या बालमूर्तीचे दर्शन घेण्यासाठी गर्दी करत आहेत. यासाठी उत्तर प्रदेश पोलिसांनी कडक सुरक्षा व्यवस्था केली आहे.  भक्ताने रस्त्यावर सोडलेली चप्पलही चोरीला जात नाही, अशी येथील यंत्रणा पाहून भाविकही थक्क होत आहेत.

मित्रांनो, तुम्ही कोठेही मंदिरात दर्शनासाठी गेल्यावर प्रथम चिंता भेडसावते ती सोबत असलेल्या चपलेच्या सुरक्षेची. बाहेर चप्पल सोडून मंदिरात दर्शनासाठी गेल्यावर परत येईपर्यंत चप्पल जागेवर राहीलच असे नाही. बऱ्याच ठिकाणी भाविकांना असा अनुभव येतो.अनेक मंदिरात दर्शनासाठी भाविकांची मोठी रीघ असते.  त्यामुळे दर्शन आटोपून बाहेर येईपर्यंत बराच वेळ झालेला असतो. अशात त्या भाविकाची चप्पल कोणीतरी पळवली की मोठी अडचण होऊन बसते.  सध्याच्या काळात अनेक भाविकांना चप्पल, सॅंडल, बूट वापरायची सवय झालेली आहे. अलीकडे या वस्तू बऱ्याच महागड्याही असतात. मंदिरापर्यंत आल्यानंतर बऱ्याच ठिकाणी चप्पल ठेवण्याचे स्टॅन्ड उपलब्ध करून देण्यात आले आहेत.  परंतु अनेकांना या स्टॅन्डच्या रांगेत उभे राहण्याची वेळ नसते. त्यामुळे मंदिराबाहेर चपला सोडून ते दर्शनासाठी जातात. येईपर्यंत चप्पल गायब झालेली पाहून त्यांचा आनंद हिरावला जातो. पण आयोध्येत उत्तर प्रदेश पोलिसांनी भाविकांची चप्पल किंवा साहित्य चोरीला जाऊ नये म्हणून मोठी खबरदारी घेतल्याचे दिसून येते. मंदिरात मोबाईल, चार्जर, इयर सेट अशा वस्तू नेण्यास परवानगी नाही. त्यामुळे यासाठी लॉकरची मोफत सुविधा उपलब्ध केली आहे. पण चप्पल ठेवण्यासाठी स्टॅन्ड नाही. भाविक इतक्या मोठ्या प्रमाणात आल्यावर अशी सोय करणे शक्यच नाही. त्यामुळे जिथून रांगेला सुरुवात होते तिथेच भाविक चप्पल व बूट सोडून देतात.  दर्शन घेऊन परत आल्यानंतर या वस्तू जागेवरच असल्याचे दिसून येते. भाविकांची चप्पल किंवा इतर साहित्य चोरणाऱ्यांना तीन वर्षे आयोध्येत येऊ दिले जाणार नाही असा दंडक केल्याने तुम्ही कोणत्याही मंदिरासमोर चप्पल सोडून गेला तरी ते साहित्य आहे त्याच जागेवर राहते हे येथील वैशिष्ट्य म्हणावे लागेल.

मित्रांनो, मुंबई मंत्रालय पत्रकार संघ व सोलापूर श्रमिक पत्रकार संघ यांच्या माध्यमातून मी अयोध्येचा अभ्यास दौरा केला. त्यात आलेले अनुभव तुमच्यासमोर मांडत आहे. सध्या अयोध्यानगरीत भक्तांचा महापूर आला आहे. देशभरातून नव्हे तर जगभरातून प्रभू श्रीरामचंद्र यांच्या दर्शनासाठी भाविक येऊ लागल्याने गर्दी वाढली आहे. नव्याने मंदिर झाल्याने येथे येणाऱ्या भाविकांना सर्व सुविधा पुरवण्यासाठी उत्तर प्रदेश सरकारचा आटोकाट प्रयत्न सुरू आहे.  पण येथे भाविकांची झालेली गर्दी पाहता सुविधा तोकड्या पडत आहेत. सर्वात महत्त्वाचे म्हणजे भाविकांना राहण्याची व्यवस्था होणे गरजेचे आहे. प्रभू श्रीराम यांच्या मंदिर निर्माण सुरू झाल्यावर उत्तर प्रदेश सरकारने भविष्यात भाविकांची येणारी गर्दी लक्षात घेऊन रस्ते व प्रवासी सुविधा उपलब्ध केली आहे.  सालारपूर हे नवीन रेल्वे स्टेशन विकसित करण्यात आले आहे. या रेल्वे स्थानकापासून अयोध्येतील मुख्य चौकापर्यंत भाविकांना सोडण्यासाठी इ बसची मोफत सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

अयोध्येत तुम्ही काय पहाल?

अयोध्येत गेल्यावर काय काय पाहायला मिळेल याची बऱ्याच जणांना उत्सुकता आहे. रेल्वेचे तुम्ही अयोध्येला जाण्यासाठी तिकीट काढल्यानंतर ई तिकिटावर देखील माहिती उपलब्ध करण्यात आली आहे. केंद्र सरकारने अयोध्येचे पर्यटन मार्केटिंग करण्यासाठी प्रत्येक राज्यातून  आस्था या विशेष रेल्वेची सुविधा दिली आहे. मंदिराचे बांधकाम पहिल्या टप्प्यातच झालेले आहे हे खरे आहे. प्रभू श्रीरामचंद्र यांच्या बालमूर्तीची ज्या ठिकाणी प्रतिष्ठापना करण्यात आली, त्या मंदिराचे प्रवेशद्वार व बाजूचे दोन शिखराचे बांधकाम पूर्ण झालेले आहे. मुख्य गाभाराचे शिखर अद्याप पूर्ण झालेले नाही. बाजूच्या सर्व मंदिरांचे बांधकाम सुरू आहे. त्यामुळे या मंदिराचे बांधकामे पूर्ण करण्यासाठी काही दिवसानंतर दर्शन बंद होईल, अशी पोलीस व भाविकात चर्चा आहे. प्रभू श्रीरामचंद्र यांच्या बालमूर्तीचे दर्शन झाल्यानंतर तुम्हाला बाजूलाच 100 मीटर अंतरावर हनुमान गढी आहे. येथे श्री हनुमान यांचे दर्शन झाल्यानंतर बाजूलाच चालत काही अंतर गेल्यावर महाराजा दशरथ महल व कनक महाल पाहण्यासारखे आहेत.  अयोध्येच्या लता चौकातून दोन किलोमीटर अंतरावर प्रभू श्रीराम यांचे मंदिर आहे. या मार्गावर दोन्ही बाजूला दुकाने थाटली आहेत.  या ठिकाणाहून ई रिक्षा द्वारेही तुम्हाला मंदिरापर्यंत जाता येते. समोरच शर्वरी नदीचे पात्र आहे. या ठिकाणी घाट विकसित करण्यात आला असून भाविकांच्या स्नानाची सोय झाली आहे. शर्वरी नदीकाठची सायंकाळची आरती पाहण्यासारखी असते. या ठिकाणी साऊंड सिस्टीम द्वारे लेजर्स शो पाहण्यासारखा असतो. याचबरोबर इतर अनेक ठिकाणे पाहण्यासारखी आहेत.  तुम्ही चालतच ही प्रेक्षणीय स्थळे पाहण्यासाठी फिरू शकता. यासाठी पोलीस किंवा गाईडची मदत घेऊ शकता. रिक्षावाल्यांना विचारणा केल्यास तुमची आर्थिक लूट होऊ शकते.  राहण्यासाठी उत्तर प्रदेश सरकारने टेन्ट सिटी विकसित केली आहे.  इतर सामाजिक संस्थांनीही कमी भाड्यामध्ये असे टेन्ट उभे केले आहेत. सद्यस्थितीत भक्त निवासाची बांधकामे झाली नसल्याने अशा टेंटमधूनच भाविकांना राहण्याची सोय केली आहे, पण ही यंत्रणा तोकडी पडते.

लोकांना मिळाला रोजगार

उत्तर प्रदेशात सध्या गव्हाची शेती तेजीत आहे. त्यामुळे येथील सर्व लोक कामात आहेत. सर्वत्र हिरवळ, डोंगर यामुळे तापमान कमी असते. केंद्र सरकारच्या मंदिर उभारणीवर सध्या मोठी टीका केली जाते. पण अर्धीतील चित्र पाहिल्यास मंदिर उभारणीतून पर्यटनाचे मोठे मार्केट उभारल्याचे दिसून येते. यातून स्थानिक लोकांना मोठा रोजगार उपलब्ध झाला आहे. भविष्यात अयोध्येजवळील पाच जिल्ह्यांना याचा मोठा लाभ होऊ शकतो असे स्थानिक नागरिक सांगतात. अयोध्या मंदिरासाठी येथील स्थानिक नागरिकांनी गेल्या पाचशे वर्षात पगडी बांधली नव्हती. मंदिर उभारणीनंतर येथील लोकांनी पगडी बांधण्यास सुरुवात केली, असे स्थानिक सुरज सिंग यांनी सांगितले. त्यामुळे येथील बाजारात अशा पगडी मोठ्या प्रमाणावर विक्रीस उपलब्ध आहेत. भुसावळपासून अयोध्येपर्यंतच्या गावामध्ये सर्वच घरावर झेंडे उभारून आनंद साजरा केल्याचे स्पष्टपणे दिसून येते. भविष्यानंतर तिरुपतीच्या धर्तीवर अयोध्येतही धार्मिक पर्यटन ही संकल्पना मोठ्या प्रमाणावर उदयास येणार आहे. अयोध्या देशातील एक नंबरचे धार्मिक पर्यटन करण्याचा उत्तर प्रदेश सरकारचा प्रयत्न दिसून येत आहे. राजकीय टीकाटिप्पणी सोडली तर पंतप्रधान नरेंद्र मोदी व उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री आदित्यनाथ योगी यांच्या या कामाचे कौतुकच होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *