सोलापूर : जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे यांनी कार्यालयातील व्यसनी बहाद्दराविरुद्ध सुरू केलेल्या दंडात्मक कारवाईचा अनेकांनी धसका घेतल्याचे दिसून येत आहे. बांधकाम विभागातील एका कर्मचाऱ्याने अनेक वेळा सांगूनही एकाच वेळी पाच गुटका पुड्या खाण्याची आपली सवय बदलली नव्हती पण आता सीईओच्या कारवाईने धसका घेत त्याने कार्यालयात शिस्त बाळगल्याचे सर्वांना आश्चर्य वाटत आहे.
महिला दिनाच्या कार्यक्रमानंतर सीईओ आव्हाळे यांनी कार्यालयांना भेटी देऊन व्यसनी बहाद्दरांवर कारवाई सुरू केली आहे. याचा फटका बांधकाम विभागातील एका कर्मचाऱ्याला बसला आहे. त्यानंतरही आव्हाळे यांची मोहीम सुरूच आहे. या कार्यालयातील एका कर्मचाऱ्याला गुटख्याचे मोठे व्यसन आहे. यापूर्वी तालुका पंचायत समितीमध्ये असताना एकाच वेळी पाच- पाच पुड्या खाण्याचा त्याला मोह आवरत नसे. इतर सहकारी कर्मचारी व अधिकाऱ्यांनी सांगूनही त्याने आपल्या सवयीत बदल केला नव्हता. प्रवास असो अथवा कार्यालय त्याचा तोबरा नेहमी भरलेला असायचा. सीईओ आव्हाळे यांच्या मोहिमेनंतर कार्यालयातील अधिकाऱ्यांनी त्याला समजावून सांगितले. सर्वांना त्याचीच भीती वाटत होती. सीईओ आव्हाळे यांच्या दुसऱ्या राउंडमध्ये सर्वच कर्मचारी हबकले कारण सीईओ नेमक्या त्याच्यासमोर जाऊन उभ्या राहिल्या. त्यांनी विचारलेल्या प्रश्नांना त्या कर्मचाऱ्याने सहजपणे उत्तरे दिल्याने सर्वांचा जीव भांड्यात पडला. सीईओ गेल्यानंतर सर्वजण त्याच्या टेबलसमोर जमले. अरे बरा झालास तू वाचलास असे सर्वांनी आश्चर्य व्यक्त केले. तपासणीची कुणकुण लागल्याने आपण हा मोह टाळला व यापुढे कार्यालयात हे व्यसन करणार नसल्याची त्याने कबुली दिल्यानंतर सर्वांना हायसे वाटले. सीईओ आव्हाळे यांच्या या मोहिमेमुळे अनेक कर्मचाऱ्यांमध्ये सुधारणा होत असल्याने समाधान व्यक्त होत आहे. आरोग्य विभागातील काही मंडळी अशा व्यसनी कर्मचाऱ्यावर लक्ष ठेवून असल्याची चर्चा आहे. त्यामुळे आता पुढील कारवाईचा कोणाचा नंबर लागणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.