सोलापूरराजकीय

आडमस्तरांना फडणवीसांचा टोला; घरे कोणी दिली हे लोकांना माहिती आहे

शक्ती प्रदर्शनाद्वारे भाजपचे उमेदवार राम सातपुते, रणजीतसिंह निंबाळकर यांचा उमेदवारी अर्ज दाखल

  • सोलापूर : तुम्ही आता कोणत्याही पक्षात जावा, आमचे काही म्हणणे नाही. पण सोलापुरात 30 हजार घरे बांधण्यासाठी आम्ही व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मदत केली आहे, हे तुम्ही विसरलत.   पण लोकांना खरं काय ते माहिती आहे, असा टोला राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माजी आमदार अडम मास्तर यांना मंगळवारी येथे बोलताना लगावला.

लोकसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पार्टी आणि महायुतीचे सोलापूर लोकसभेचे उमेदवार आमदार राम सातपुते आणि माढा लोकसभेचे उमेदवार खासदार रणजितसिंह नाईक – निंबाळकर यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत मिरवणुकीने जोरदार शक्ती प्रदर्शन करीत उमेदवारी अर्ज दाखल केला.  त्यानंतर आयोजित जाहीर सभेत उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी विरोधकांना जोरदार प्रत्युत्तर दिले. सोलापूर व सातारा जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती असताना गेल्या 70 वर्षात येथील नेत्यांनी काय केले? असाल सवाल उपस्थित करीत या व्यासपीठावर उपस्थित असलेले भाजपच्या आमदारांनी वेळोवेळी पाठपुरावा करून सिंचन योजना आणून लोकांना पाणीदार केले. दुष्काळीत तालुक्यातील महिलांच्या डोक्यावरील हंडा उतरविला. कोरोना महामारीनंतर जगातील अनेक देश आर्थिकदृष्ट्या संकटात आलेले असताना हिंदुस्थानातील वाघ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या चाणक्य नीतीमुळे अर्थव्यवस्था मजबूत टिकून राहिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोलापूर सह महाराष्ट्र राज्याला मोठमोठे महामार्गासाठी निधी दिला. त्यामुळे विकासाची गंगा गेल्या दहा वर्षात वाहत आहे. आयुष्यमान भारत, किसान सन्मान योजनेसारख्या अनेक योजना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गरीब व शेतकऱ्यांसाठी राबविले आहेत. त्यामुळे विरोधकांनी कितीही खडे फोडले तरी त्याचा परिणाम होणार नाही असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

रणजीतदादा काळजी करू नका…

विरोधकांनी माढा मतदारसंघात भूलथापा मारून काही जणांना आमच्यातून नेले असले तरी रणजीतदादा तुम्ही काळजी करू नका. लोकांना खरं काय ते माहिती आहे. त्यामुळे माजी आमदार कै. गणपतराव देशमुख यांचे स्वप्न साकार करण्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही काम करत आहोत. सांगोल्यासारख्या दुष्काळी तालुक्यातील जनतेचे स्वप्न आम्ही साकार केल्याशिवाय राहणार नाही, असा शब्द फडणवीस यांनी यावेळी दिला.

रामभाऊ लढणारा नेता

रामभाऊ रडणारा नव्हे तर लढणारा नेता आहे. विरोधक पैशाच्या जोरावर रामभाऊची बदनामी करण्याचा प्रयत्न करीत आहेत. पण लक्षात ठेवा अत्यंत गरिबीतून आलेला आमचा रामभाऊ तुमच्या आशीर्वादाने निवडून येणार आहे. याबाबत मला विश्वास आहे. तुम्हाला देशाचा पंतप्रधान म्हणून कोण हवा आहे? असे म्हणतात उपस्थित लोकांमधून आवाज आला, नरेंद्र मोदी.. मोदी. मोदी यांना पंतप्रधान करण्यासाठी भाजपला साथ द्या असे आवाहन करीत बरोबर दोन वाजता उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी आपले भाषण संपवले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button