सोलापूर : तब्बल 14 वर्षानंतर सोलापूर शहर पोलिसांनी सोरेगाव जलशुद्धीकरण केंद्राजवळ असलेल्या वाहन तपासणी नाक्याची जागा बदलली आहे. शहराच्या जवळ सुरू केलेल्या तपासणी नाक्यामुळे आता चक्क दुचाकी स्वारानीही वाहतूक पोलिसांचा ससेमीरा चुकवण्यासाठी आपला मार्ग वाकडा केल्याचे दिसून येत आहे.

सन 2012 मध्ये सोलापूर शहरात जड वाहतुकीचा प्रश्न गंभीर बनला होता. विजयपूर व हैदराबाद मार्गाने येणारी जड वाहतूक धर्मवीर संभाजी तलाव, पत्रकार भवन, महावीर चौक, पाण्याचे टाकी या मार्गे सुरू होती. या जड वाहतुकीमुळे अनेकांचे बळी गेले. शाळकरी मुलांच्या एकापाठोपाठ एक असे अपघात झाल्यामुळे शहरांमध्ये संतापाची लाट उसळली. मोर्चे निघाल्यामुळे जिल्हा प्रशासनाने या मार्गावर सकाळी नऊ ते रात्री नऊ या काळात जड वाहनांना बंदी घातली.  पोलीस आयुक्तालयाने या बंदीची अंमलबजावणी सुरू केली. हैदराबाद नाका व सोरेगाव जलशुद्धीकरण येथे फलक लावून या बंदीची अंमलबजावणी सुरू झाली. बंदी काळात जड वाहने शहरात येऊ नये यासाठी या दोन्ही ठिकाणी वाहतूक पोलिसांचा नाका लावण्यात आला. बंदी काळात वाहतूक पोलीस जड वाहने अडवून ठेवत असल्यामुळे हैदराबाद रोडवर मार्केट यार्ड व सोरेगाव जलशुद्धीकरण केंद्रापासून हत्तुरपर्यंत जड वाहनांच्या रांगा लागत होत्या. रात्री नऊ नंतर ही वाहतूक सुरू झाल्यानंतर महावीर चौकात मध्यरात्री एक वाजेपर्यंत वाहतूक पोलिसांना ड्युटी करावी लागत होती. राष्ट्रीय महामार्ग विभागाने हत्तुर ते केगाव बायपास सुरू केल्यानंतर दोन वर्षांपूर्वी शहरातील जड वाहतुकीचा प्रश्न संपुष्टात आला. तरीही शहर वाहतूक पोलिसांनी हा नाका बंद केलेला नव्हता. या नाक्यावर कर्नाटकातून आलेली वाहने तपासणी करण्याची मोहीम सुरूच आहे. येथील वाहतूक पोलिसांचा ससेमीर चुकवण्यासाठी बरेच दुचाकीस्वार डोणगाव व इतर मार्गे शहरात येत होते. त्यामुळे गेल्या आठवड्यात पोलिसांनी हा नाका आता सैफुलजवळील लक्ष्मी मंदिराच्या टेकडीजवळ आणला आहे. दिवसा वाहतूक पोलीस येथून जाणाऱ्या दुचाकी स्वारांची तपासणी करीत असल्यामुळे हा ससेमीरा चुकवण्यासाठी दुचाकीस्वार आता एसआरपीच्या बाजूने असलेल्या रस्त्याने रॉंग साईडने खुशकीचा मार्ग पकडल्याचे दिसून येत आहे. वाहतूक पोलिसांना तपासणीवेळी हा पॉईंट सोयीचा झाला आहे तर दुचाकी स्वारांना मात्र डोकेदुखी ठरला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *