April 18, 2026

Solapur Samachar

Latest Marathi News

पालातील मरीआई कुटुंबांना मिळणार हक्काचे घर

सोलापूर : केंद्र व राज्य शासनाच्या पुरस्कृत घरकुल योजनेतून सोलापूर जिल्ह्यातील अंत्रोळी व दहिवडी येथे पहिली कॉलनी बांधण्यात येत असून दहिवडीतील पालात राहणाऱ्या मरीआईवाले भटके समाजातील 19 कुटुंबांना हक्काचे घर मिळणार आहे.

जिल्हा परिषदेच्या जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेमार्फत सोलापूर जिल्ह्यात सन 2016-17 पासून घरकुल योजना राबविण्यात येत आहे. या विविध घरकुल योजनांच्या माध्यमातून जिल्ह्यात आत्तापर्यंत 55 हजार 511 घरे बांधण्यात आली आहेत. प्रधानमंत्री आवास योजनेत 44 हजार 424 घरांचे उद्दिष्ट होते त्यातील 38 हजार 383 घरे पूर्ण झाले असून 5, 843 घरकुलाचे काम प्रगतीपथावर आहे. रमाई आवास योजनेतून 22 हजार 439 घरांचे उद्दिष्ट होते त्यातील 15 हजार 636 घरे बांधून पूर्ण झाली असून 5, 671 घरांचे बांधकाम प्रगतीपथावर आहे.  शबरी आवास योजनेतून 702 घरकुलाचे उद्दिष्ट असून त्यातील 596 घरे बांधून पूर्ण झाली आहेत 90 घरांचे बांधकाम प्रगतीपथावर आहे. गतवर्षी मोदी आवास योजना सुरू झाली असून 11 हजार 19 घरांचे उद्दिष्ट देण्यात आले आहे त्यातील 878 घरे पूर्ण झाली असून दहा हजार 140 घरांचे बांधकाम प्रगतीपथावर आहे.  पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर योजनेतून गतवर्षी 259 घरांचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. अद्याप या घराच्या बांधकामाला सुरुवात झालेली नाही. अटल बांधकाम कामगार आवास योजना ही सन 2018- 19 मध्ये सुरू करण्यात आली असून 27 घरांचे उद्दिष्ट देण्यात आले होते त्यातील 11 घरांचे बांधकाम पूर्ण झाले असून 16 घरांचे बांधकाम प्रगतीपथावर आहे.  यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजनेतून सन 2022 -23 मध्ये 14 घरांचे उद्दिष्ट देण्यात आले होते. त्यातील सात घरांचे बांधकाम पूर्ण झाले असून सात घरांचे बांधकाम प्रगतीपथावर आहे. सन 2018- 19 पासून ग्रामीण गवंडी प्रशिक्षण कार्यक्रम सुरू करण्यात आला असून यात 2, 996 गव्हड्यांना प्रशिक्षण देण्याचे उद्दिष्ट होते त्यातील 1,484 गवंड्यांना प्रशिक्षण देण्यात आले आहे तर 1,512 गवंड्यांचे प्रशिक्षण सुरू आहे.

विविध योजनेतून घरकुल मंजूर झालेले बरीच कुटुंबे जागेविना थांबून होती. अशा कुटुंबांना जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे, जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद व जिल्हा विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक सुधीर ठोंबरे यांच्या पाठपुराव्यामुळे महसूल विभागाकडून जागा मिळाली. पाच हजार 85 कुटुंबांना गायरान,  गावठाण भागातून जागा उपलब्ध करून देण्यात आली आहे तसेच खाजगी जागा विकत घेणाऱ्या कुटुंबांना 50 हजाराचे अनुदान दिले जात होते ते आता एक लाखावर नेण्यात आले आहे.

अंत्रोळी, दहिवडीत पहिली कॉलनी

गावात जागेची अडचण असल्याने अनेक कुटुंबांना घरकुल बांधता येत नव्हते. त्यामुळे गावठाणात जागा मिळवून एकत्रित घरे बांधण्याची संकल्पना पुढे आली. त्यातून दक्षिण सोलापूर तालुक्यातील अंत्रोळी येथे बारा तर मंगळवेढा तालुक्यातील दहिवडी येथे 19 घरांची कॉलनी बांधण्यात येत आहे. सहाय्यक प्रकल्प संचालक या कामावर लक्ष ठेवून आहेत. दहिवडी येथील लाभार्थी मरीआई समाज कुटुंबातील आहेत. आत्तापर्यंत ते पालात राहत होते. आता त्यांना हक्काचं घर मिळणार आहे.

पुणे विभागात सोलापूर जिल्हा परिषदेला घरकुलाचे मोठे उद्दिष्ट आहे.मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे यांच्या मार्गदर्शनाखाली लाभार्थ्यांना जागा व वाळूच्या अडचणीवर मात करीत लाभार्थ्यांना मार्गदर्शन करत उद्दिष्ट साध्य करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. जिल्ह्यात पहिल्यांदाच दोन गावात कॉलनीद्वारे योजना साकार केली आहे.

सुधीर ठोंबरे, प्रकल्प संचालक,

जिल्हा विकास यंत्रणा