सोलापूर : जिल्हा परिषदेचे माजी सदस्य अरुण तोडकर हे दक्षिण सोलापूर भाजपचे माजी अध्यक्ष हनुमंत कुलकर्णी यांना 5 हजारांचा आहेर करणार आहेत. सोलापूर लोकसभा निवडणुकीत कोण जिंकणार ? या पैजेतून जिंकलेल्या रकमेतून हा सोहळा झेडपीत रंगणार आहे.
जिल्हा परिषदेचे माजी सदस्य कामानिमित्त नेहमीच झेडपी येत असतात. लोकसभा निवडणुकीवेळेस अनेक सदस्य झेडपीत हजेरी लावताना दिसत होते. सोलापूर व माढा लोकसभा मतदारसंघात लागलेली चुरस पाहता कोण जिंकणार? हा चर्चेचा विषय झाला होता. माजी पक्षनेते अण्णाराव बाराचारे यांच्या कार्यालयात जिल्हा नियोजन समितीचे सदस्य डॉ. चनगोंडा हवीनाळे आले होते. याच दरम्यान जिल्हा नियोजन समितीचे माजी सदस्य अरुण तोडकर येथे आले. त्यावर कक्षात उपस्थित असलेल्या इतर कार्यकर्त्यांनी त्यांना काय ‘अकलूज”ची हवा? अशी विचारणा केली. त्यावर तोडकर यांनी सोलापूर व माढा आमचीच सीट येणार असे सांगितले. त्यावर हवीनाळे यांनी सोलापूरला भाजपची सीट येणार लावा पैज असे चॅलेंज दिले. त्यावर तोडकर यांनी सोलापूरला काँग्रेसची सीट तर धैर्यशील मोहिते पाटील सव्वा लाखाच्या मताधिक्याने निवडून येतील अशी पाच हजाराची पैज लावली.
माढा व सोलापूर लोकसभा मतदारसंघात कोण जिंकणार ? हा या वेळेस खूप चर्चेचा विषय ठरला होता. भाजपने उमेदवारी नाकारल्यानंतर धैर्यशील मोहिते – पाटील यांनी तुतारी हाती धरली. गेल्या वेळेस भाजपसोबत निवडणूक लढवताना माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील यांनी एक लाखाचा लीड देण्याची घोषणा केली होती आणि त्यांनी दिलेला शब्द खरा ठरला. या लोकसभेच्या निवडणुकीत मात्र चक्क मोहिते- पाटील यांच्या कार्यकर्त्यांनी किती लीड मिळेल याचे भाकीत केले होते. तोडकर यांनीही याबाबत भाष्य केले होते. निवडणूक निकालानंतर तोडकर यांचा अंदाज खरा ठरला. हवीनाळे यांच्याकडून पाच हजाराची पैज जिंकल्यामुळे लवकरच या पैजेच्या रकमेतून भाजपचे दक्षिण सोलापूर तालुका माजी अध्यक्ष हनुमंत कुलकर्णी यांना फुल्ल कपड्याचा आहेर करून पेढे वाटणार असल्याचे तोडकर यांनी सांगितल्याने जिल्हा परिषदेत हा चर्चेचा विषय झाला आहे.