राजकुमार सारोळे
विशेष बातमी
सोलापूर : पंढरपुरात आषाढी एकादशीनिमित्त वाळवंटात वारकऱ्यांची तोबा गर्दी आणि तिकडे पुण्यात धुवाधार पाऊस झाल्यामुळे वीर धरण ओरव्हफ्लो झाले. चंद्रभागेत पाण्याचा मोठा लोंढा आल्यास काय होईल? या विचाराने व्हीआयपी बंदोबस्तात असलेल्या कलेक्टर एस कार्तिकेयन यांचा श्वास काही वेळ रोखला गेला. अत्यंत संयम राखत पाटबंधारे अधिकाऱ्यांशी सतत संपर्क ठेवत कलेक्टर कार्तिकेयन यांनी चंद्रभागेतील पाण्यावर नियंत्रण ठेवले. केवळ अन केवळ कलेक्टर कार्तिकेयन यांच्या संयम सुचकतेने वारकऱ्यावर येणारे संकट टळले असल्याची खात्रीलायक माहिती आपत्कालीन प्रशासनात सक्रिय असलेल्या अधिकाऱ्यांनी दिली.
यंदाच्या आषाढीवारीला प्रतिवर्षाप्रमाणे वारकऱ्यांच्या गर्दीचा विक्रम झाला. या गर्दीची व्यवस्था करण्याची मोठी जबाबदारी जिल्हा प्रशासनावर होती. पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली कलेक्टर कार्तिकेयन यांनी सुरुवातीपासूनच सर्व यंत्रणाशी संपर्क ठेवत वारी अतिशय निर्विघ्नपणे पार पाडले. पोलीस, जिल्हा परिषद, ग्रामपंचायत, नगर परिषदेबरोबर याचे श्रेय महसूल यंत्रणेला जाते. पण वारकरीच व्हीआयपी म्हणून महाराष्ट्र शासनाने राबविलेल्या वारीच्या संकल्पनेला कलेक्टर कार्तिकेयन यांनी खऱ्या अर्थाने न्याय दिला. दर्शन रांगेत उभे असलेल्या वृद्ध जोडप्याला त्यांनी व्हीआयपी दर्शन दिल्याचे तुम्ही पाहिलेच असेल. पण या पलीकडे जाऊन त्यांनी वारी यशस्वी करण्यासाठी सर्व यंत्रणाशी संपर्क साधत खूप मोठे कष्ट घेतले आहेत. पंधरा दिवस त्यांचा पंढरीतच मुक्काम होता. या काळात पालखी मार्ग व पंढरपुरात येणारे भाविकांवर त्यांचे लक्ष होते. दर्शन रांगेतील असुविधा याबाबत वारकऱ्यांनी सोशल मीडियाद्वारे लक्ष वेधले. अशा प्रत्येक गोष्टींची दखल कलेक्टर कार्तिकेयन यांनी घेतल्याचे दिसून आले. दर्शन रांग लांबल्यानंतर भाविकांना छत, प्रकाश पिण्याचे पाणी व इतर सुविधा नसल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर तीन वेळा कलेक्टर कार्तिकेयन पायी चालत दर्शन रांगेच्या शेवटच्या टोकापर्यंत पोहोचले. प्रत्येक भाविकाला त्रास होणार नाही, सुविधा मिळेल याकडे त्यांनी लक्ष दिले. ही सुविधा पुरवण्यासाठी त्यांनी संबंधित यंत्रणेतील अधिकारी व कर्मचाऱ्यांवर अधिकार गाजवला नाही तर सर्वांशी संवाद साधून आपल्याला हे करायचे आहे असे म्हटल्यावर सगळे यंत्रणा झपाटून कामाला लागल्याचे दिसून आले. पालखी मार्गावर येण्याच्या पाण्याच्या तक्रारी आल्यावर सर्वात प्रथम कलेक्टर पोहोचले होते. जिल्हा परिषदेच्या कनिष्ठ अभियंत्यांना संपर्क साधून पिण्याचे शुद्ध पाणी उपलब्ध करून देण्यापर्यंत त्यांनी लक्ष दिले. वारकऱ्यांच्या वेशात सुविधांवर लक्ष ठेवण्यासाठी पायी चालत फिरत असलेले कलेक्टर पाहून वारीसाठी आलेल्या वारकऱ्यांनाही आश्चर्य वाटले.
करकंबच्या झेडपी सदस्यांकडून स्वागत
पालखी सोहळा पंढरपूर नजीक आल्यानंतर करकंब मध्ये मोठी गर्दी होते याची माहिती मिळताच कलेक्टर कार्तिकेयन यांनी स्वतः तेथे जाऊन सुविधांची माहिती घेतली. जिल्हा परिषदेचे सदस्य आदिनाथ देशमुख यांनी त्यांचे स्वागत केले व वारकऱ्यांसाठी कोणकोणत्या गोष्टी आवश्यक असतात याची माहिती दिली. त्यामुळे प्रत्यक्ष पालखी सोहळा आल्यानंतर वारकऱ्यांना येथे कोणताही त्रास झालेला नाही हे येथे उल्लेखनीय.
येणार होते संकट पण…
आषाढी यात्रेच्या आदल्या दिवशीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पंढरपुरात आले. पालखी सोहळे पोचल्यामुळे पंढरपुरात भाविकांचा महापूर आला होता. पुंडलिक मंदिर परिसर व वाळवंट भाविकांनी फुलले होते. अशात पुणे परिसरात पावसाने जोरदार हजेरी लावली होती. त्यामुळे उजनी धरण क्षेत्रातील धरणे तुडुंब झाली होती. वीर धरण ओव्हरफ्लो होण्याच्या स्थितीत होते. हा पाण्याचा प्रवाह भिमेत वेगाने आला तर काय होईल या चिंतेने कलेक्टर सजग झाले. व्हीआयपी बंदोबस्ताची जबाबदारी सांभाळतच त्यांनी पाटबंधारे अधिकाऱ्यांशी संपर्क करीत भीमात येणाऱ्या फ्लोवर नियंत्रण मिळवले. आषाढी वारीच्या दिवशी भाविकांचा फ्लो कमी होईल तसे पाण्याचा विसर्ग वाढविण्यात आला. यामुळे संकट टळले आणि संबंधित अधिकाऱ्यांनी सुटकेचा श्वास घेतल्याची माहिती पुढे आली आहे. त्यामुळे आषाढी वारी काळात वारकऱ्यांसाठी कलेक्टर कार्तिकेयन यांचे नियोजन देवदूतासारखे ठरले आहे अशी चर्चा भाविकात सुरू झाली आहे.

More Stories
सोलापुरात रेल्वेसमोर उडी मारून मायलेकीची आत्महत्या
अभिनंदन: वारी विनावाद टेंडर, स्वच्छतागृह, जर्मन हँगरची सुविधा; क्रेडिट गोज टू कोहीणकर
सोलापूर झेडपी पदाधिकाऱ्यांकडून मुख्यमंत्री फडणवीस यांचे स्वागत