सोलापूर : आषाढी वारीच्या सोहळ्यात सहभागी होण्यासाठी आळंदीहून निघालेल्या श्री संत शिरोमणी ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्याचे गुरुवारी सकाळी सोलापूर जिल्ह्यातील धर्मपुरी येथे आगमन झाले जिल्हा प्रशासनाने पालखी सोहळ्याचे जोरदार स्वागत केले यावेळी आयएएस अधिकारी व जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे याही भारुडात दंग झाल्या.
पंढरीच्या वारीचा महिमा जगप्रसिद्ध आहे. दरवर्षी आषाढीवारीत अनेक भक्त मोठ्या भक्तिभावाने सहभागी होतात. यात लहान- थोर, आबाल- वृद्ध पांडुरंगाच्या नामस्मरणात दंग होऊन जातात. आता महाराष्ट्रातील वारकऱ्यांना वेध लागले आहेत ते पांडुरंगाच्या दर्शनाचे. आषाढीवारी दिवशी पांडुरंगाचे दर्शन घेण्यासाठी अनेक भाविक पाऊले पंढरीची वाट चालत आहेत. मानाच्या माऊलींच्या पालख्या पंढरीच्या दिशेने येत आहेत. गुरुवारी श्री संत शिरोमणी ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखींचे सातारा जिल्ह्यातून सोलापूर जिल्ह्यात आगमन झाले आहे.
जिल्ह्याच्या सरहद्दीवरील धर्मपुरी येथे माऊलींच्या सोहळ्याच्या स्वागतासाठी जिल्हा प्रशासनातील अधिकारी व लोकप्रतिनिधी मोठ्या संख्येने हजर आहेत. पालकमंत्री चंद्रकांत पाटील व जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी वारकऱ्यांच्या वेशात येऊन माऊलींच्या पालखीचे स्वागत केले. पंढरीची वाट समीप येईल तसे भक्तांचा उत्साह व महापूर वाढला आहे. माऊलींच्या पालखीच्या स्वागतासाठी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे याही सहभागी झाले आहेत. धर्मपुरी येथे स्वच्छता विभागातर्फे जनजागृतीसाठी भारुडाचे आयोजन करण्यात आले होते. या भारुडामध्ये आव्हाळे आनंदाने सहभागी झाल्या. मृदुंगाचा गजर करीत त्यांनी इतर महिलांनाही साथ दिली. यामुळे वारकऱ्यांच्या सेवेसाठी असलेल्या जिल्हा परिषदेच्या कर्मचाऱ्यांमध्ये उत्साह दुणावला आहे. ग्रामपंचायत, आरोग्य, पाणी व स्वच्छता विभाग, बांधकाम विभागाचे कर्मचारी, ग्रामपंचायतची यंत्रणा भाविकांच्या सेवेसाठी कार्यरत झाली आहे. माळशिरसचे प्रभारी गटविकास अधिकारी मनोज राऊत यांनी सर्व यंत्रणा सज्ज ठेवली आहे.