सोलापूर : विधानसभा सार्वत्रिक निवडणूक-२०२४, दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघातून माजी आमदार दिलीप माने यांचा काँग्रेस पक्षाकडून उमेदवारी मागणीचा अर्ज सोलापूर शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष चेतन नरोटे यांच्याकडे त्यांचे स्वीय सहाय्यक शिवाजी घोडके- पाटील यांनी काँग्रेसभवन येथे मंगळवारी सादर केला.

आगामी विधानसभा निवडणुकीसाठी सोलापूर शहर काँग्रेसने इच्छुक उमेदवाराचे अर्ज मागविले आहेत. या अर्जासाठी 20 हजाराचे डिपॉझिट ठेवण्यात आले आहे. इतके डिपॉझिट भरून इच्छुक त्यांच्या आवडीच्या मतदारसंघातून उमेदवारी मागणी करू शकतात. त्यानंतर संकलित झालेले हे उमेदवारी अर्ज काँग्रेसच्या वरिष्ठ कमिटीकडे पाठवण्यात येणार आहेत. सध्या काँग्रेसकडे खासदार प्रणिती शिंदे यांचा रिकामा झालेला सोलापूर शहर मध्य व दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघ चर्चेत आहे. मागील वेळेस दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघातून मनपा स्थायी समितीचे माजी सभापती बाबा मिस्त्री यांनी निवडणूक लढविली होती. विद्यमान आमदार सुभाष देशमुख यांना त्यांनी जोरदार टक्कर दिली होती. त्यामुळे त्यांना पुन्हा या मतदारसंघातून संधी द्यावी अशी मुस्लिम समाजातर्फे जोरदार मागणी होत आहे.  अशातच या मतदारसंघात माजी आमदार दिलीप माने, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य सुरेश हसापुरे हे इच्छुक आहेत. दिलीप माने यांनी या मतदारसंघात आपला पहिला हक्क सांगितला आहे. त्यामुळे भाजपचे आमदार सुभाष देशमुख यांच्या तोडीस तोड उमेदवाराने आत्ताच मागणी केल्याने त्यांच्या अडचणीत वाढ होणार आहे. पण मागील विधानसभेचा अनुभव लक्षात घेता काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे,  खासदार प्रणिती शिंदे काय निर्णय घेणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *